जामिनावर सुटताच कुख्यात गुन्हेगार तेजाचा मैत्रिणीवर गोळीबार; छत्रपती संभाजीनगरची घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2025 11:51 IST2025-08-12T11:51:04+5:302025-08-12T11:51:27+5:30

कारागृहातून बाहेर येताच अनेकांनी कुख्यात गुन्हेगार तेजाच्या स्वागताचे रील बनवले. सोशल मीडियावर त्याचे शस्त्रांसह पोस्ट करत स्वागताचे स्टेटस ठेवले.

Notorious criminal Teja shoots at girlfriend after being released on bail; Chhatrapati Sambhajinagar incident | जामिनावर सुटताच कुख्यात गुन्हेगार तेजाचा मैत्रिणीवर गोळीबार; छत्रपती संभाजीनगरची घटना

जामिनावर सुटताच कुख्यात गुन्हेगार तेजाचा मैत्रिणीवर गोळीबार; छत्रपती संभाजीनगरची घटना

छत्रपती संभाजीनगर : नुकत्याच जामिनावर सुटलेल्या एका कुख्यात गुन्हेगाराने किलेअर्क परिसरात पिस्तुलाद्वारे स्वत:च्या मैत्रिणीवरच गोळी झाडली. सोमवारी रात्री ११ वाजता ही धक्कादायक घटना घडली. जखमी तरुणीला घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

सय्यद फैजल ऊर्फ तेजा सय्यद एजाज (रा. किलेअर्क), असे संशयिताचे नाव आहे. सोमवारी रात्री ८ वाजता तेजा बेगमपुरा परिसरात बराच वेळ दहशत माजवत फिरत होता. त्याच्या दहशतीमुळे स्थानिकांपैकी कोणीही त्याला विरोध केला नाही. बेधुंद नशेत असलेल्या तेजाने नंतर किलेअर्क परिसरात मैत्रिणीचे घर गाठले. तेथे तिच्याशी वाद घालून मारहाण केली. त्यानंतर काही क्षणात पिस्तूल काढून गोळी झाडली. या घटनेमुळे परिसरात एकच हलकल्लोळ उडाला. गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संभाजी पवार यांना घटनेची माहिती मिळताच त्यांच्या सूचनेवरून बेगमपुरा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक मंगेश जगताप, गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक संदीप शिंदे, विशाल बोडखे यांनी घटनास्थळी धाव घेतली.

कोण आहे तेजा ?
सय्यद फैजल ऊर्फ तेजा हा शहरातील कुख्यात गुन्हेगार असून, त्याच्यावर बलात्कार, शस्त्रसाठा, ड्रग्ज तस्करीसारखे १५ पेक्षा अधिक गंभीर गुन्हे दाखल आहेत. कारागृहातून बाहेर येताच अनेकांनी त्याच्या स्वागताचे रील बनवले. सोशल मीडियावर त्याचे शस्त्रांसह पोस्ट करत स्वागताचे स्टेटस पडले. मात्र, गुन्हे शाखेसह बेगमपुरा पोलिसांनी या गोष्टीला गांभीर्याने घेतले नाही. जामिनावर सुटलेल्या कुख्यात गुन्हेगारांच्या दहशतीविषयी 'लोकमत'ने रविवारीच वृत्त प्रकाशित करून पोलिसांच्या कार्यशैलीवर गंभीर प्रश्न उपस्थित केले होते.

कोणावर केला हल्ला ?
काही महिन्यांपूर्वी सिटी चौक पोलिसांनी अवैधरीत्या पिस्तूल बाळगून दहशत माजवणाऱ्या नांदेडच्या एका सुशिक्षित तरुणीला ताब्यात घेतले होते. ती तेजासह पुंडलिकनगरमधील एका कुख्यात गुन्हेगाराची मैत्रीण आहे. दरम्यान, घटनेची माहिती कळताच सुस्तावलेले शहर पोलिस दल रात्रीतून सक्रिय झाले. रात्री उशिरा तेजाच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आली. मात्र, केवळ पोलिसांचे दुर्लक्ष व त्यांना गांभीर्य नसल्यानेच कुख्यात गुन्हेगारांचा आत्मविश्वास वाढल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.

Web Title: Notorious criminal Teja shoots at girlfriend after being released on bail; Chhatrapati Sambhajinagar incident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.