मोकाट कुत्र्यांची दहशत वाढली !

By Admin | Updated: July 31, 2014 00:44 IST2014-07-31T00:20:30+5:302014-07-31T00:44:31+5:30

येणेगूर : उमरगा तालुक्यातील येणेगूर प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत जवळपास १५ गावे येतात. येणेगूरसह परिसरात मोकाट कुत्र्यांनी उच्छाद घातला असून

Mokat dogs become terrorized! | मोकाट कुत्र्यांची दहशत वाढली !

मोकाट कुत्र्यांची दहशत वाढली !

येणेगूर : उमरगा तालुक्यातील येणेगूर प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत जवळपास १५ गावे येतात. येणेगूरसह परिसरात मोकाट कुत्र्यांनी उच्छाद घातला असून, दोन वर्षामध्ये तब्बल सव्वाशेवर लोकांचे लचके तोडले आहेत. या रुग्णांना येथील आरोग्य केंद्राच्या माध्यमातून रेबीपूर लस देण्यात आली आहे.
येणेगूरसह परिसरातील गावांमध्ये कुत्र्यांची संख्या वाढली आहे. २००७ च्या पशुगणनेनुसार जिल्ह्यामध्ये ७४ हजार ५५५ इतकी कुत्र्यांची संख्या आहे. तर येणेगूर प्राथमिक केंद्रांतर्गत २००३ च्या पशुगणनेनुसार १७७ इतकी कुत्र्यांची संख्या आजघडीला यामध्ये कितीतरी पटीने वाढ झालेली आहे. त्यानुसार ‘डॉग बाईट’चे प्रमाणही त्याचगतीने वाढत आहे. एप्रिल २०१२ ते मार्च २०१३ या कालावधीत तब्बल ९० जणांना कुत्र्यांनी चावा काढला. ही संख्या केवळ प्राथमिक आरोग्य केंद्रात आलेल्या रुग्णांची आहे. खाजगी दवाखान्यात उपचार घेतलेल्या रुग्णांची संख्या तर वेगळीच आहे. संबंधित व्यक्तींना रेबीपूर लसीचे ६० डोस देण्यात आले. एप्रिल २०१३ ते जुलै २०१४ या कालावधीत ३७ जणांचा कुत्र्याने चावा काढला. त्यांना ८० डोस देण्यात आले आहेत.
दिवसेंदिवस मोकाट कुत्र्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. लहान मुले, जनावरे यासोबतच मोठ्या माणसांवरही मोकाट कुत्री हल्ला करीत आहेत. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. अशा मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात यावा, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.
येणेगूर प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणारी गावे
येणेगूर, तुगाव, दस्तापूर, कोळनूर (पा), भोसगा, बलसूर, दाळींब, शास्त्रीनगर तांडा, शिवाजीनगर तांडा, नळवाडी, कोराळ, सुपतगाव यासह आदी गावांचा या आरोग्य केंद्रांतर्गत समावेश आहे.
पशुपालकांना आर्थिक भुर्दंड
मागील काही महिन्यात पिसाळलेल्या कुत्र्यांनी अनेक जनावरांचे लचके तोडले. मात्र एकाही पशुवैद्यकीय दवाखान्यात जनावरांना देण्यासाठीची लस उपलब्ध नव्हती. या संदर्भात काही डॉक्टरांकडून जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता, शासनाने २००८ पासूनच पुरवठा बंद केल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे संबंधित पशुपालकांना खाजगी औषध भांडारातून लस खरेदी करावी लागत आहे.
तर ७५ टक्के रक्कम मिळते परत
जनावरांना श्वान दंश झाल्यास संबंधित पशुपालकांनी संबंधित लस खाजगी औषधी दुकानातून घेतल्यास त्याची पावती पशुवैद्यकीय दवाखान्यात सादर केल्यास संबंधित शेतकऱ्यांना ७५ टक्के रक्कम जिल्हा परिषदेकडून परत दिली जाते, असे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी शितलकुमार मुकणे यांनी सांगितले.
जानेवारी, फेब्रुवारी २०१४ या दोन महिन्यातच रेबीपूर लसीचा तुटवडा झाला होता. त्यानंतर मात्र नियमितपणे मागणीनुसार डोस उपलब्ध होत आहेत. सध्या या लसीचा तुटवडा नसल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. डी.एन. जोशी यांनी ‘लोकमत’ शी बोलताना सांगितले

Web Title: Mokat dogs become terrorized!