'इम्तियाज जलील हेच अर्बन टेररिस्ट! निदा खानला त्यांनीच लपवलं'; संजय शिरसाटांचा थेट हल्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2026 13:55 IST2026-05-13T13:46:54+5:302026-05-13T13:55:59+5:30
संजय शिरसाटांचे जलील यांना थेट आव्हान, नगरसेवक मतीन पटेलनंतर आता जलील यांचे घरही रडारवर?

'इम्तियाज जलील हेच अर्बन टेररिस्ट! निदा खानला त्यांनीच लपवलं'; संजय शिरसाटांचा थेट हल्ला
छत्रपती संभाजीनगर: नगरसेवक मतीन पटेल यांच्या अनधिकृत बांधकामावर महापालिकेने चालवलेल्या हातोड्यानंतर शहरात राजकारण तापले आहे. मंत्री संजय शिरसाट यांनी आज पत्रकार परिषद घेऊन एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांच्यावर टीकेची तोफ डागली. "इम्तियाज जलील हे खऱ्या अर्थाने 'अर्बन टेररिस्ट' असून त्यांनीच निदा खानला मुंब्रा येथून संभाजीनगरमध्ये आणून लपवले होते," असा खळबळजनक दावा शिरसाट यांनी केला आहे.
"जलील यांनी कुराणवर हात ठेवून सांगावे"
संजय शिरसाट पुढे म्हणाले की, संपूर्ण महाराष्ट्राचे पोलीस ज्या निदा खानचा शोध घेत होते, तिला ३५ दिवस मतीन पटेल यांच्या घरात लपवून ठेवण्याचे कारस्थान जलील यांनीच रचले होते. "बिचाऱ्या नगरसेवकाचा यात काही रोल नाही, त्याला जलील यांनीच ओढले आहे. जलील यांनी कुराणवर हात ठेवून सांगावे की त्यांनी निदा खानला शहरात आणले नाही का?" असे आव्हानही त्यांनी दिले.
आता जलील यांच्या घराचीही चौकशी
मतीन पटेल यांच्यावरील कारवाईचे समर्थन करताना शिरसाट यांनी स्पष्ट केले की, ते बांधकाम पूर्णपणे अनधिकृत होते आणि न्यायालयानेही त्यांना दिलासा दिला नव्हता. इतकेच नव्हे तर, "इम्तियाज जलील यांचे घरही अनधिकृत आहे का, याची मी चौकशी लावणार आहे. नकाशाप्रमाणे बांधकाम नसेल तर त्यांचेही घर पाडले जाईल," असा सज्जड दम शिरसाट यांनी भरला आहे.
विषाचे बी पेरत असल्याचा आरोप
शहरात 'लव्ह जिहाद' आणि धर्मांतराचे कारस्थान रचले जात असून जलील हे निजामाची मानसिकता जोपासत आहेत, असा गंभीर आरोपही मंत्र्यांनी केला. मतीन पटेल यांच्या जबाबावरून जलील यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करत सरकार पोलिसांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे त्यांनी सांगितले.