गणरायाला जल्लोषात निरोप
By Admin | Updated: September 10, 2014 00:53 IST2014-09-10T00:34:51+5:302014-09-10T00:53:23+5:30
औरंगाबाद : पुढच्या वर्षी लवकर येण्याचा वादा करून वरुणराजाच्या साक्षीने गणाधिपतीला सोमवारी निरोप देण्यात आला.

गणरायाला जल्लोषात निरोप
औरंगाबाद : पुढच्या वर्षी लवकर येण्याचा वादा करून वरुणराजाच्या साक्षीने गणाधिपतीला सोमवारी निरोप देण्यात आला. पावसाची रिमझिम, ढोल-ताशांचा दणदणाट, बँडपथकाच्या धूनवर थिरकणारी तरुणाई, चित्तथरारक मर्दानी खेळ, असे अमाप उत्साहाचे ११ तास औरंगाबादकरांनी अनुभवले. जुन्या शहरासोबतच सिडको-हडको, गारखेडा, मुकुंदवाडी परिसरातील ‘श्री’ विसर्जन मिरवणूक जल्लोषात, शिस्तीत व शांततेत पार पडली. दुपारी १ वाजता सुरू झालेला असंख्य वाद्यांचा दणदणाट रात्री १२ वाजता बंद झाला.
महाराष्ट्राचे लाडके दैवत गणाधिपतीने वर्षभरासाठी निरोप घेताना दुष्काळाचे विघ्नही दूर केले. यामुळे सोमवारी विसर्जन मिरवणुकीत पावसाने हजेरी लावली तेव्हा साऱ्यांचा आनंद द्विगुणित झाला होता. भर पावसात मिरवणुकी काढण्यात आल्या. तरुण, ज्येष्ठ मंडळींसोबतच तरुणी, महिला व चिमुकल्यांचा सहभागही वाखाणण्याजोगा ठरला.
सावरकर चौकातील गणेश महासंघ उत्सव समितीच्या कार्यालयात श्रींची आरती शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांच्या हस्ते झाली. यावेळी महासंघाचे संस्थापक अध्यक्ष पृथ्वीराज पवार, अध्यक्ष प्रमोद राठोड, महासंघाचे सर्व पदाधिकारी हजर होते.
रिमझिम पाऊस सुरू असतानाच ग्रामदैवत संस्थान गणपती मंदिरात खा.चंद्रकांत खैरे, पोलीस आयुक्त राजेंद्र सिंह यांच्या हस्ते आरती झाली. यावेळी आ. प्रदीप जैस्वाल, महापौर कला ओझा, किशनचंद तनवाणी, प्रकाश मुगदिया, सुभाषचंद चोरडिया, प्रफुल्ल मालाणी, गोपी घोडेले आदींची उपस्थिती होती.
ग्रामदैवताची आरती होताच मुख्य मिरवणुकीला भर पावसात दुपारी १ वाजता सुरुवात झाली. संस्थान गणपतीची प्रतिकृती बैलगाडीच्या रथात ठेवण्यात आली होती. रथाला पुष्पहाराने सजविण्यात आले होते. चाळीसगावहून आलेल्या बँडपथकाने सुरुवातीला गणपतीची आरती व नंतर देशभक्तीपर गीताची धून वाजविली. यापाठोपाठ गणेश महासंघ उत्सव समितीच्या वाहनात ‘श्री’ची मूर्ती आणण्यात आली होती. या वाहनाला समोरील बाजूस फायबरचे अश्व लावण्यात आले होते.
मिरवणुकीत सर्वप्रथम सहभागी होण्याचा मान जाधवमंडी येथील अष्टविनायक गणेश मंडळाने पटकाविला. लालबाग राजाची भव्य मूर्ती लक्ष वेधून घेत होती. रिमझिम सुरू असतानाही उत्साह मात्र कमी झाला नव्हता.
यानंतर विविध भागांतून सार्वजनिक गणेश मंडळांचे आगमन होत राहिले. जम्बो ढोलपथकासोबत लेझीम, पावली, झांज पथक घेऊन गणेश मंडळांनी मिरवणुकीत रंगत आणली. शहागंज, सराफा रोड, गांधी चौक, मछली खडक, गुलमंडी, औरंगपुरामार्गे जिल्हा परिषद मैदानावर मिरवणूक पोहोचत होती. आरती करून मूर्तीचे विसर्जन केले जात होते.