करमाड : शेंद्रा एमआयडीसीतील डी सेक्टर, प्लॉट नंबर १६२ (गोकुळवाडी) मध्ये असलेल्या तिरुपती एंटरप्राइजेस या कंपनीला शॉर्टसर्किटमुळे बुधवारी पहाटे ६ वाजेच्या सुमारास भीषण आग लागली. ही आग इतकी भयंकर होती की, जवळपास पंधरा-वीस किलोमीटरवरून काळ्या धुराचे लोट दिसत होते. सुदैवाने या घटनेत जीवितहानी झालेली नाही. मात्र, कोट्यवधींचा कच्चा माल जळून खाक झाला. अग्निशमन दलाच्या ५-६ बंबाच्या साह्याने सलग ६ तास प्रयत्न करून आग आटोक्यात आणण्यात आली.
शेंद्रा एमआयडीसीतील कुंभेफळ हद्दीत असलेल्या गोकुळवाडीसारख्या नागरी वस्तीत अशा पद्धतीने कंपनीला आग लागल्याने नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. कंपनीच्या शेडसमोरील कंपाउंडमध्ये प्लास्टिकचे दाणे बनवण्यासाठी कच्चा माल (लॅमिनेशन, एलडी,) याचा भला मोठा ढीग होता. पहाटे ६ वाजेच्या सुमारास शेजारील ट्रान्सफॉर्मरमध्ये शॉर्टसर्किट होऊन ठिणग्या पडल्याने कच्च्या मालाने पेट घेतला. आगीने रौद्ररूप धारण केले.
६ अग्निशमन बंब, १० टँकर दिमतीला...ही आग विझवण्यासाठी एमआयडीसीतील अग्निशमन विभागाचे ६ बंब प्रयत्न करत होते. शिवाय पंचक्रोशीतील आठ ते दहा ट्रॅक्टर टँकरच्या साह्याने या बंबासाठी पाणीपुरवठा सुरू होता. सलग सहा तास प्रयत्न केल्यानंतर आग नियंत्रणात आली. दहा वाजेनंतर परिस्थिती आटोक्यात आली. ही कंपनी पूर्णपणे नागरी वस्तीत असल्याने करमाड पोलिस ठाण्याचे पो.नि. प्रताप नवघरे हे स्वतः आजूबाजूची घरे रिकामी करून नागरिकांना सुरक्षित स्थळी जाण्याचे आवाहन करत होते. करमाड पोलिसांचा फौजफाटा या ठिकाणी तैनात होता.
आपत्ती व्यवस्थापनासाठी नियोजन काय?गोकुळवाडीत नागरी वस्तीशेजारी अनेक कंपन्या आहेत. आगीच्या घटना घडल्यास सुरक्षा म्हणून या कंपनीकडे कुठलीच यंत्रणा दिसून आली नाही. शिवाय कंपनीच्या गेटच्या दोन्ही बाजूने दोन ट्रान्सफॉर्मर आहेत. अशा धोक्याच्या जागांची पाहणी करून त्वरित आपत्ती व्यवस्थापनाचा बंदोबस्त करण्याची मागणी एमआयडीसीतील कामगार व नागरिक करत आहेत.
भरमसाठ गोडाऊन असलेल्या वसाहती...शेंद्रा, कुंभेफळ, लाडगाव, करमाड, नाथनगर आदी गावांच्या नागरी वस्तीत अनेक कंपन्यांनी कच्चा माल साठवणुकीसाठी जागा किंवा शेड भाड्याने घेतलेले आहे. अशा मोठमोठ्या गोडाऊनला आग लागल्यास नागरी वस्तीला त्यामुळे धोका निर्माण होऊ शकतो. ग्रामपंचायत स्तरावरून व इतर संबंधित संस्थांनी याची चौकशी करून आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी आता जोर धरत आहे.
पंचतारांकित उद्योगनगरीची ही अवस्था कशी?एमआयडीसीतील धनगर वस्ती असलेल्या या गोकुळवाडीत प्रशासनाने ही कंपनी सुरू करत असताना कशी परवानगी दिली? कारण या ठिकाणी अग्निशमनची कोणतीही सुविधा नसल्याचे सिद्ध झाले. एकीकडे पंचतारांकित म्हणून नावलौकिक असलेल्या शेंद्रा एमआयडीसीत अशा पद्धतीने घटना होत असेल, तर याची चौकशी करून प्रशासनातील बेपर्वाईविरुद्धदेखील कारवाई व्हावी.- विठ्ठल कोरडे, पंचायत समिती सदस्य, छत्रपती संभाजीनगर
तत्परतेने यांनी केले मदतकार्य...अग्निशामक दलाचे स्टेशन ऑफिसर विकास माने, विकास पाटील, राजू तडवी, तेजस खातणे, विकास सूर्यवंशी, जालिंदर नेमाने, तुकाराम मुंढे, विकास सुकुंडे, गणेश उगले आदींनी आग विझवण्यासाठी मेहनत घेतली.
ग्रामपंचायतीकडून तत्काळ टँकर दिलेही वस्ती कुंभेफळ ग्रामपंचायतीच्या अखत्यारीत असली तरी गावठाण हद्दीपासून दूर एमआयडीसीला लागूनच आहे. कुठल्या कंपनीला काय परवानगी द्यायची किंवा फायर सेफ्टीबद्दल बंधने टाकायची हा सर्व अधिकार एमआयडीसीला असून ग्रामपंचायतीचा त्यात संबंध नसतो. आम्ही या घटनेनंतर ग्रामपंचायतीकडून तत्काळ टँकर पुरवठा सुरू ठेवला.- कांताबाई मुळे, सरपंच कुंभेफळ
Web Summary : A major fire broke out at Tirupati Enterprises in Shendra MIDC due to a short circuit. The blaze destroyed crores worth of raw materials. Firefighters battled for six hours to control the inferno, averting potential disaster near Gokulwadi's residential area. No casualties were reported.
Web Summary : शेंद्रा एमआईडीसी में तिरुपति एंटरप्राइजेज में शॉर्ट सर्किट से भीषण आग लग गई। आग से करोड़ों का कच्चा माल जलकर खाक हो गया। दमकल कर्मियों ने छह घंटे की मशक्कत के बाद आग पर काबू पाया, जिससे गोकुलवाड़ी के रिहायशी इलाके में संभावित खतरा टल गया। कोई हताहत नहीं हुआ।