Deputy CM Eknath Shinde Missing Link News: महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्राच्या विकासाची ‘लिंक’च मिस केली होती; पण आम्ही ती केवळ जोडली नाही, तर विकासाला थेट वेग देणारी नवी कनेक्टिव्हिटी निर्माण केली, असा खोचक टोला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लगावला. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचे लोकार्पण करताना एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर जोरदार प्रहार करत, हा प्रकल्प म्हणजे वर्षानुवर्षे जनतेला भेडसावणाऱ्या ट्रॅफिकच्या डोकेदुखीवर सरकारने दिलेला ठोस आणि कायमस्वरूपी उपाय असल्याचे ठामपणे अधोरेखित केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘यशवंतराव चव्हाण मुंबई–पुणे द्रुतगती मार्ग क्षमता वाढ’ अंतर्गत मिसिंग लिंक प्रकल्पाचे लोकार्पण पार पडले. या सोहळ्यास उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, रोजगार हमी मंत्री भरत गोगावले, महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे, एम एस आर डी सी राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, गृहनिर्माण राज्यमंत्री माधुरी मिसाळ, खासदार सुनील तटकरे, तसेच एमएसआरडीसीचे व्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड, अतिरिक्त मुख्य सचिव मनिषा म्हैसकर, अतिरीक्त मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, एफ्कॉन आणि नवयुग या कंपन्यांचे प्रतिनिधी, पत्रकार आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हा प्रकल्प खऱ्या अर्थाने अभियांत्रिकी चमत्कार
शिंदे म्हणाले की, हा प्रकल्प खऱ्या अर्थाने अभियांत्रिकी चमत्कार असून, अत्यंत आव्हानात्मक परिस्थितीत पूर्ण करण्यात आला आहे. महाराष्ट्र दिनाच्या दिवशी या प्रकल्पाचे लोकार्पण होणे ही अत्यंत अभिमानाची बाब असून त्यांनी सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छाही दिल्या. मुंबई–पुणे द्रुतगती मार्ग हा देशातील पहिला एक्सप्रेसवे असून त्यामागची संकल्पना हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी मांडली होती. त्या वेळी नितीन गडकरी मंत्री होते आणि त्यांनी ही संकल्पना पुढे नेली. पूर्वी घाटामध्ये ८–१० तास रेंगाळावे लागायचे; मात्र एक्सप्रेसवे झाल्यानंतर प्रवास २ ते २.५ तासांत पूर्ण होऊ लागला आणि लोकांनी मुंबई–पुणे दरम्यान रोजचा प्रवास सुरू केला.मात्र घाटातील ट्रॅफिक जाम ही मोठी समस्या होती. लोकांना डोकेदुखी होत होती.
नागरिकांनाही मोठा फायदा होणार आहे
सुमारे ७ हजार कोटी रुपयांचा हा प्रकल्प असून त्यातून निर्माण होणारी आर्थिक वाढ अनेक पटीने अधिक असेल. पुण्यात आयटी, सर्व्हिस इंडस्ट्री आणि रिअल इस्टेटचा मोठ्या प्रमाणावर विकास झाला, त्याप्रमाणे या प्रकल्पामुळे आणखी विकासाला चालना मिळेल. या प्रकल्पामुळे मुंबई–पुणे प्रवासात ३० ते ४० मिनिटांची बचत होणार आहेच, शिवाय सातारा, सांगली आणि पश्चिम महाराष्ट्रातील नागरिकांनाही मोठा फायदा होणार आहे. वेळ, इंधन आणि खर्च वाचणार असून प्रदूषण आणि अपघातांमध्येही मोठी घट होईल. टायगर व्हॅली परिसरात १८२ मीटर उंचीचा व्हायडक्ट उभारण्यात आला असून तो भारतातील सर्वात उंच आहे. या कामाची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली आहे. एवढ्या उंचीवर काम करणे अत्यंत कठीण होते. सुरुवातीला मजूर आणि अधिकारी घाबरून काम सोडून जात होते; त्यांना पुन्हा शोधून आणावे लागायचे, अशीही त्यांनी आठवण सांगितली.
दरम्यान, या प्रकल्पात अनेक अडचणी आणि आव्हाने होती. इच्छाशक्ती आणि सरकारचा पाठिंबा असेल तर कोणताही प्रकल्प पूर्ण करता येतो, हे या प्रकल्पातून सिद्ध झाले आहे.वन्य प्राण्यांच्या संरक्षणासाठीही विशेष उपाय योजना करण्यात आल्या असून, पाण्याअभावी प्राणी रस्त्यावर येऊन अपघात होत होते; त्यामुळे त्यांच्यासाठी पाण्याची व्यवस्था करण्यात आली. पर्यावरणाला कोणतीही बाधा न आणता हा प्रकल्प पूर्ण करण्यात आला. दररोज एक कोटी रुपयांपेक्षा अधिक इंधन बचत होणार आहे. अत्याधुनिक टनेल्स, सुरक्षा यंत्रणा आणि नियोजनामुळे हा मार्ग अधिक सुरक्षित झाला आहे. अपघात झाल्यास तत्काळ उपाययोजना करण्याची पूर्ण व्यवस्था करण्यात आली आहे. या प्रकल्पामुळे घाट सेक्शन पूर्णपणे टाळता येणार असून प्रवास अधिक सुखकर होणार आहे. लाखो-कोट्यवधी लोकांना याचा फायदा होणार असून लोक सरकारला नक्कीच दुवा देतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
Web Summary : DCM Eknath Shinde criticized the previous government for missing a vital development link, which his government rapidly connected, benefiting commuters on the Mumbai-Pune Expressway. This project will save time, fuel, and reduce accidents.
Web Summary : डीसीएम एकनाथ शिंदे ने पिछली सरकार की आलोचना करते हुए कहा कि उन्होंने विकास की एक महत्वपूर्ण कड़ी को तोड़ दिया, जिसे उनकी सरकार ने तेजी से जोड़ा, जिससे मुंबई-पुणे एक्सप्रेसवे पर यात्रियों को लाभ होगा। इससे समय, ईंधन की बचत होगी और दुर्घटनाएँ कम होंगी।