व्यवसायाच्या आमिषातून लाखोंची फसवणुक, तणावातून विवाहितेने संपवले जीवन
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2025 15:31 IST2025-10-09T15:30:58+5:302025-10-09T15:31:33+5:30
गुन्हा दाखल होताच बेगमपुरा पोलिसांकडून २ भावांना अटक, अनेकांना फसवल्याचा पोलिसांना संशय

व्यवसायाच्या आमिषातून लाखोंची फसवणुक, तणावातून विवाहितेने संपवले जीवन
छत्रपती संभाजीनगर : व्यवसायात दामदुप्पट परताव्याचे आमिष दाखवत पैशांसह सोने उकळून २ भावांनी फसवणुक केल्याने तणावाखाली गेलेल्या मनिषा संजय पांडे (३२, रा. पोलिस कॉलनी, हर्सुल) यांनी विष प्राषण केल होते. दि. ७ रोजी मध्यरात्री त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी त्यांना फसवणाऱ्या रविंद्र प्रेमनाथ बोर्डे (३६) व अनुपम प्रेमनाथ बोर्डे (४०, दोघे रा. सिलेगाव, गंगापुर) यांना बेगमपुरा पोलिसांनी अटक केली. तर रवींद्रची पत्नी ज्योती पसार झाली.
२०१७ मध्ये आरोपी अनुपम मनिषा यांच्या घरात भाडेतत्वावर राहण्यास गेला होता. जवळपास ६ वर्षे अनुपम, भाऊ रविंद्रसोबत त्यांच्या घरात राहिले. त्या दरम्यान रविंद्र हा कामगार कल्याण आयुक्तालयात एजंट होता. या विभागातर्फे मुलांना शालेय साहित्याचे वाटप होत होते. त्यासाठी रविंद्रने मनिषा यांचा मुलगा आकाशला संस्था स्थापन करुन अशी शासकीय कामे करुन नफा मिळण्याचे आश्वासन दिले. त्याच्यावर विश्वास ठेवत मनिषा यांनी आकाशसाठी त्याला १ लाख ४४ हजार दिले. रविंद्रने एप्रिल २०२३ मध्ये प्रारंभी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था स्थापन केली. त्याच्या अध्यक्षपदी रविंद्रने अनुमपला तर सचिवपदी स्वत:ची नियुक्ती केली. स्थापनेनंतर मात्र त्याने एकदाही आकाश, मनिषा यांना नफा दिला नाही. २५ फेब्रुवारी २०२५ रोजी रविंद्रने लग्नाचे कारण करुन पुन्हा त्यांच्या नावे २ लाख रुपये कर्ज काढले. त्याचीही परतफेड केली नाही. पुन्हा त्यांचा विश्वास जिंकत नव्या व्यवसायासाठी त्यांच्याकडून ३.५ तोळ्याचे दागिने घेत ८ दिवसांत परत करण्याचे आश्वासन दिले. मात्र, ते देखील परत केले नाही.
धमक्या आणि मारहाण
मनिषा व आकाशने सातत्याने रविंद्र व अनुपमकडे पैसे, दागिने परत करण्यासाठी तगादा लावला. मात्र, दोघांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. काही दिवसांपुर्वी तीघांनी मनिषा यांना धमकावत मारहाण केली. या तणावातून मनिषा यांनी १९ सप्टेंबर रोजी विषारी औषधाचे सेवन केले.
१० ऑक्टोबर पर्यंत पोलिस कोठडी
७ ऑक्टोबर रोजी मनिषा यांचा मध्यरात्री उपचारा दरम्यान मृत्यू झाला. विषारी औषध सेवन करण्यापुर्वी त्यांनी लिहिलेली चिठ्ठी कुटुंबाला मिळाली. त्यात त्यांनी स्पष्टपणे रविंद्र, अनुपम व रविंद्रच्या पत्नीच्या छळामुळे आत्महत्या करत असल्याचे नमुद केले होते. त्या आधारे बेगमपुऱ्याचे उपनिरीक्षक मारोती मदेवाड यांनी गुन्हा दाखल करत बहिणीकडे लपून बसलेल्या रविंद्र व अनुपमला अटक केली. न्यायालयाने दोघांना १० ऑक्टोबर पर्यंत पोलिस कोठडी सुनावली.