टेम्पो सोडण्यासाठी वनपालाच्या सांगण्यावरून ४० हजार घेणारा अटकेत, वनपाल पसार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2025 12:56 IST2025-07-12T12:43:13+5:302025-07-12T12:56:28+5:30

चिकलठाण्याच्या सॉ मिलचा व्यवस्थापक रंगेहाथ अटकेत; चाहूल लागताच मालक, वनपाल पसार

Man arrested for taking Rs 40,000 on the advice of a forest ranger to release a tempo, forest ranger flees | टेम्पो सोडण्यासाठी वनपालाच्या सांगण्यावरून ४० हजार घेणारा अटकेत, वनपाल पसार

टेम्पो सोडण्यासाठी वनपालाच्या सांगण्यावरून ४० हजार घेणारा अटकेत, वनपाल पसार

छत्रपती संभाजीनगर : लाकूड घेऊन जाणारा आयशर पकडून तो सोडण्यासाठी १ लाख रुपये मागून ४० हजार रुपयांची लाच घेणाऱ्या वनपालासह सॉ मिलचा मालक, व्यवस्थापकावर जालना एसीबीने कारवाई केली. मात्र, सापळ्यात वनपालाच्या सांगण्यावरून पैसे घेणारा सॉ मिलचा व्यवस्थापक शेख अब्दुल मुजाहिद शेख कबीर याला पकडताच वनपाल मनोज त्रिंबक कुमावत व सॉ मिल मालक सय्यद इमरोज सय्यद खाजा हे दोघे पळून गेले. गुुरुवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास चिकलठाण्यात ही कारवाई करण्यात आली.

बीडस्थित असलेल्या तक्रारदाराची बीडमध्ये सॉ मिल आहे. लाकडांची वाहतूक करण्यासाठी त्यांच्याकडे दोन मोठे टेम्पो आहेत. ३ जुलै रोजी मध्यरात्री २ वाजता झाल्टा फाटा परिसरातून जात असताना कुमावतने त्यांचा टेम्पो पकडून सय्यद इमरोजच्या चिकलठाण्यातील सॉ मिलमध्ये लावला. ८ जुलै रोजी तक्रारदाराने कुमावतची भेट घेतली असता टेम्पो सोडण्यासाठी १ लाख रुपयांची मागणी केली. शिवाय, ३ जुलै रोजी पकडलेल्या टेम्पोबाबत त्याने कुठलीही नोटीसदेखील दिली नाही. टेम्पो सोडण्यासाठी पैसे मागत असल्याने तक्रारदाराने जालना एसीबीकडे तक्रार केली. १० जुलैला पोलिस निरीक्षक शरदचंद्र रोडगे यांच्या पथकाने लाचेच्या मागणीची पडताळणी केली. त्यात कुमावतने १ लाख रुपये मागून तडजोडीअंती ४० हजार घेण्याचे मान्य केल्याचे निष्पन्न झाले. एस. के. सॉ मिलचा मालक सय्यद इमरोजही लाच देण्यासाठी प्रोत्साहित करत होता.

टोपी उजव्या हातात पकडण्याचा ठरला इशारा
कुमावतने तक्रारदाराला गुरुवारी रात्री ८ वाजता चिकलठाण्यात मिल व्यवस्थापकाला भेटून पैसे देण्यास सांगितले. त्यानंतर शुक्रवारी टेम्पो सोडण्याचे आश्वासन दिले. एसीबीने सापळा रचला. तक्रारदाराला डोक्यावरील टोपी काढून उजव्या हातात धरण्याचा इशारा ठरला होता. व्यवस्थापकाने पैसे घेताच तक्रारदाराने इशारा केला व एसीबीने त्याला रंगेहाथ पकडले. ही चाहूल लागताच वनपाल कुमावत, सॉ मिल मालक इमरोज यांनी पळ काढला. अटकेतील आरोपीला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

Web Title: Man arrested for taking Rs 40,000 on the advice of a forest ranger to release a tempo, forest ranger flees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.