छ. संभाजीनगरात गुटखा माफियांवर FDA चा सर्जिकल स्ट्राईक! ७ दुकाने सील, लाखोंचा मुद्देमाल जप्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2026 14:20 IST2026-04-18T14:20:06+5:302026-04-18T14:20:41+5:30
नवनियुक्त आयुक्तांचा धडाका! शहर आणि ग्रामीण भागात गुटखा विक्रेत्यांवर छापे; लाखोंचा मुद्देमाल जप्त.

छ. संभाजीनगरात गुटखा माफियांवर FDA चा सर्जिकल स्ट्राईक! ७ दुकाने सील, लाखोंचा मुद्देमाल जप्त
छत्रपती संभाजीनगर : राज्यात गुटखा आणि सुगंधित तंबाखूवर बंदी असतानाही छुप्या मार्गाने विक्री करणाऱ्यांवर अन्न व औषध प्रशासनाने गेल्या २ दिवसांत कारवाईचा बडगा उगारला आहे. नवनियुक्त आयुक्त श्रीधर डुबे पाटील यांनी छत्रपती संभाजीनगर शहर आणि ग्रामीण भागात धडक मोहीम राबवत ७ विक्रेत्यांवर छापे टाकले. या कारवाईत लाखोंचा मुद्देमाल जप्त करत दुकाने सील करण्यात आली असून, सर्व आरोपींवर गुन्हे दाखल केले.
भेसळयुक्त अन्नपदार्थ, सुगंधित तंबाखू, पानमसाला आणि गुटखा यांसारख्या प्रतिबंधित पदार्थांविरुद्ध कठोर पावले उचलण्याच्या सूचना नवीन आयुक्तांनी दिल्या आहेत. या धोरणाची अंमलबजावणी करत शहरात अवैध विक्रेत्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर थेट कारवाईला सुरुवात झाली आहे.
या सात ठिकाणी टाकले छापे
१. बेस्ट पानशॉप (वखार महामंडळासमोर, जुना बीड बायपास)
२. खलील पान सेंटर (जुना बीड बायपास)
३. चांगदेव दगडू डुबिले (सुंदरनगर, बागेश्वरवाडी)
४. शेख सुभान बानू (बायजीपुरा, इंदिरानगर)
५. मे. आर.आर. चिकन शॉप (दौलताबाद)
६. धनलक्ष्मी पानशॉप (एमआयडीसी वाळूज)
७. रफिक हैदर कुरेशी (पैठण)
गुन्हे नोंदवले
प्रतिबंधित अन्नपदार्थांची विक्री आणि साठवणूक करणे हा गंभीर गुन्हा आहे. या नियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी सातही विक्रेत्यांवर त्या संबंधित ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आरोपींविरुद्ध (भारतीय न्याय संहिता) कलम १२३, २२३, २७४, २७५ तसेच अन्न सुरक्षा मानके कायदा कलम ५९ अंतर्गत कारवाई करण्यात आली.
यांच्या पथकाने केली कारवाई
ही मोहीम अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहआयुक्त एस.आर. करकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. सहायक आयुक्त विवेक पाटील आणि दयानंद पाटील यांच्या नेतृत्वात अन्नसुरक्षा अधिकारी वर्षा रोडे, सुलक्षणा जाधवर, ज्योत्सना जाधव, प्रज्ञा सुरसे तसेच प्रशांत अजिंठेकर, प्रशांत कुचेकर, फरीद सिद्दीकी आणि कीर्तिका झाडे यांनी यशस्वी केली.
अधिक तीव्र मोहीम होईल
गुटखा हा प्रतिबंधात्मक आहे. कोणीही तो विकताना आढळल्यास त्याच्यावर अत्यंत कडक कारवाई करण्यात येईल. ही मोहीम पुढेही अशाच पद्धतीने आणि अधिक तीव्रतेने राबवली जाईल.
- विवेक पाटील, सहायक आयुक्त, अन्न व औषधी प्रशासन