स्पर्धा परीक्षेची तयारी करताना प्रेम, अत्याचार अन् गर्भपात; प्रशिक्षणार्थी फौजदारावर गुन्हा दाखल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2025 12:23 IST2025-11-18T12:23:02+5:302025-11-18T12:23:42+5:30
कॅफेत अत्याचार करून गर्भपात केल्याचा गंभीर आरोप : २५ वर्षीय युवतीची वर्षभरानंतर पोलिसांकडे धाव

स्पर्धा परीक्षेची तयारी करताना प्रेम, अत्याचार अन् गर्भपात; प्रशिक्षणार्थी फौजदारावर गुन्हा दाखल!
छत्रपती संभाजीनगर : स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना प्रेमसंबंधातून मैत्रिणीवर कॅफेत अत्याचार करून नंतर गर्भपात करणाऱ्या प्रशिक्षणार्थी फौजदारावर बलात्कारासह ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला. भागवत ज्ञानोबा मुलगीर (रा. परभणी) असे आरोपीचे नाव असून सध्या तो नाशिक येथे अकादमीत पोलिस उपनिरीक्षकाचे प्रशिक्षण घेत आहे. त्याच्यासह मैत्रिणीला धमकावल्याप्रकरणी त्याची बहीण व वडिलांवरही गंभीर आरोप केल्याने त्यांनाही सहआरोपी करण्यात आल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
२५ वर्षीय तरुणी व भागवत काही महिन्यांपूर्वी शहरात सोबतच स्पर्धा परीक्षेची तयारी करत होते. एकाच जिल्ह्यातील असल्याने दोघांची चांगली ओळख झाली. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. २४ फेब्रुवारी २०२४ रोजी त्यांचे क्रांती चौकातील कॅफेमध्ये संबंध प्रस्थापित झाले. त्यातून तरुणी गर्भवती राहिली. ही बाब कळताच त्याने जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण करत त्यांचे खासगी छायाचित्र व्हायरल करण्याची धमकी देत गर्भपात करण्यासाठी दबाव टाकला. गोळ्या देऊन गर्भपात केला. त्यानंतर भागवत पोलिस उपनिरीक्षकाची परीक्षा उत्तीर्ण झाला. या दरम्यान, तरुणीच्या आरोपानुसार, भागवतने तिला ब्लाॅक केले. तिने हा प्रकार त्याची बहीण व वडिलांना सांगितला. मात्र, त्यांनीदेखील 'तुला जे करायचे ते कर' असे म्हणून धमकावले. यामुळे संतप्त तरुणीने पोलिसांकडे तक्रार दिली. त्यानंतर भागवतवर बलात्कार, ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला. सोमवारी सहाय्यक पोलिस आयुक्त सागर देशमुख यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. भागवतचा शोध सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
कॅफेमध्ये चालतेय काय ?
काही महिन्यांपूर्वी शहरात कॅफेमध्ये बलात्काराचे जवळपास तीन गुन्हे दाखल झाले. त्याशिवाय, नशेखोरीचे अनेक प्रकार उघडकीस आले. ही बाब लक्षात घेत शहर पोलिस व मनपाने संयुक्तरीत्या कॅफेंवर कारवाई केली. मात्र, अद्यापही शहरात अनेक ठिकाणी अवैध, विनापरवाना कॅफे उघडले असून तेथे गैरप्रकारासाठी जागा उपलब्ध करून दिली जात आहे.