लोकमत एपीएलचा थरार! छत्रपती संभाजीनगरकरांना आजपासून क्रिकेट सामन्यांची पर्वणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2025 16:39 IST2025-02-01T16:38:03+5:302025-02-01T16:39:06+5:30
१० संघांचा सहभाग, ०९ दिवसांत २३ रोमहर्षक क्रिकेट सामन्यांची पर्वणी

लोकमत एपीएलचा थरार! छत्रपती संभाजीनगरकरांना आजपासून क्रिकेट सामन्यांची पर्वणी
छत्रपती संभाजीनगर : गतपर्वातील यशानंतर आता मराठवाड्यातील सर्वांत मोठा क्रिकेटचा महासंग्राम ‘लोकमत एपीएल’चा थरार शनिवारपासून गरवारे स्टेडियमवर रंगणार आहे. ९ फेब्रुवारीपर्यंत रंगणाऱ्या ए. ए. पटेल प्रस्तुत या एपीएलच्या या महासंग्रामात विजेतेपदासाठी १० संघांतील खेळाडू सर्वस्व पणाला लावणार आहेत.
क्रिकेट चाहत्यांना या महासंग्रामात ९ दिवसांत २३ रोमहर्षक सामन्यांची पर्वणी अनुभवायला मिळणार आहे. या स्पर्धेद्वारे षट्कार, चौकारांची आतषबाजी, वादळी शतके, चित्त्यासारखे चपळ क्षेत्ररक्षण ‘याची देही याची डोळा’ पाहण्याची संधी छत्रपती संभाजीनगरातील क्रिकेट रसिकांना मिळणार आहे. पहिला सामना संपल्यानंतर सायंकाळी रंगारंग उद्घाटन सोहळा होणार आहे.
गत पर्वातील के. एस. राव यांचा राव रॉयल्स, अकीब पटेल यांचा पटेल किंग वॉरिअर्स, सिमर राजपाल यांचा मनजीत प्राइड वर्ल्ड, मिहीर मुळे यांचा ग्रीन गोल्ड सान्या युनायटेड, संदीप नागरे यांचा भवानी टायगर्स, आदर्श अग्रवाल यांचा सीएल कासा स्ट्रायकर्स, डॉ. विक्रांत भाले यांचा लाइफलाइन मॅव्हरिक्स, राजेश शिंदे यांचा शिंदे रायझिंग किंग्ज, गुड्डू वाहूळ यांचा गुड्डू इएमआय २१, शिवम पाटील यांचा नंदिनी स्टार्स हे दहा संघ विजेतेपदासाठी एकमेकांना काट्याची झुंज देणार आहेत. एपीएलच्या १२ व्या पर्वातील सलामीची लढत १ फेब्रुवारीला अकीब पटेल यांचा पटेल किंग वॉरियर्स आणि संदीप नागरे यांच्या भवानी टायगर्स संघात दुपारी १:३० वाजता रंगणार आहे. त्यानंतर सायंकाळी ७ वाजता डॉ. विक्रांत भाले व विशाल भाले यांचा लाइफ लाइन मॅव्हरिक्स संघ गतचॅम्पियन के. एस. राव यांच्या राव रॉयल्स संघाविरुद्ध दोन हात करेल.