छत्रपती संभाजीनगरात शासकीय वसतिगृहातील जेवणात पाल; विद्यार्थ्यांचे मध्यरात्री आंदोलन!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2025 12:38 IST2025-11-26T12:35:33+5:302025-11-26T12:38:09+5:30
संतप्त विद्यार्थ्यांनी सहायक आयुक्तांना दीड तास घेराव घातला; जेवणात पाल निघाल्याने विद्यार्थ्यांना उलट्या; मेसचालकावर दादागिरीचेही गंभीर आरोप

छत्रपती संभाजीनगरात शासकीय वसतिगृहातील जेवणात पाल; विद्यार्थ्यांचे मध्यरात्री आंदोलन!
छत्रपती संभाजीनगर : किलेअर्क परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांच्या वसतिगृहात सायंकाळच्या जेवणात पाल निघाल्यामुळे विद्यार्थी आक्रमक झाले. मेसचालक बदलण्यात यावा, अशी मागणी करत युनिट नंबर १ च्या विद्यार्थ्यांनी रात्रीच आंदोलन सुरू केले. समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त रवींद्र शिंदे यांनी समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, विद्यार्थी आपल्या भूमिकेवरच ठाम राहिले.
डाॅ. बाबासाहेब आंबेडकर १००० मुलांच्या वसतिगृह संकुलात चार युनिट आहेत. प्रत्येक युनिट हे २५० विद्यार्थी क्षमतेचे आहे. युनिट नंबर १ मधील विद्यार्थी नेहमीप्रमाणे रात्रीच्या जेवणासाठी मेसमध्ये गेले. ८० टक्के विद्यार्थ्यांचे जेवण झाले होते. उर्वरित २० टक्के विद्यार्थी जेवत होते. तेव्हा भाजी घेत असताना एकाच्या पळीत (मोठा चमचा) शिजलेली पाल आली. हे पाहताच जेवणासाठी बसलेल्या विद्यार्थ्यांत खळबळ उडाली; काहींनी उलट्या केल्या, तर अनेक विद्यार्थी मेस सोडून बाहेर पडले. काही विद्यार्थ्यांनी गृहपाल धनेधर व वर्शीळ यांना फोन केला, तर काहींनी चक्क सहायक आयुक्त रवींद्र शिंदे यांनाच वसतिगृहात घडलेला प्रकार सांगितला. शिंदे तातडीने वसतिगृहात दाखल झाले. तेव्हा विद्यार्थ्यांनी घोषणाबाजी करत त्यांना घेराव घातला. त्यानंतर मळमळ झालेल्या विद्यार्थ्यांना लगेच दवाखान्यात पाठविण्यात आले. डॉक्टरांनी तपासून औषधोपचार केले व त्यांना परत पाठविले.
यावेळी सहायक आयुक्त शिंदे यांच्याकडे विद्यार्थ्यांनी मेसमध्ये निकृष्ट जेवण दिले जाते. मेसचालकांकडे जेवणाची तक्रार केल्यास ते दादागिरी करतात. पिण्याचे शुद्ध पाणी मिळत नाही. अंघोळ व कपडे धुण्यासाठी पुरेसे पाणी मिळत नाही, असे गाऱ्हाणे मांडले. संतप्त विद्यार्थ्यांनी तब्बल दीड तासांहून अधिक वेळ शिंदे यांना अडवून ठेवले.
नोटीस बजावणार
विद्यार्थ्यांच्या तक्रारीनुसार दोन दिवसांपूर्वीच मेसचालकास नोटीस बजावली होती. त्यानंतर आज जेवणात पाल निघाल्याने विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. त्या अनुषंगाने मेसचालकास उद्या सकाळी पुन्हा नोटीस बजावण्यात येणार आहे, असे गृहपाल वर्शीळ यांनी ‘लोकमत’ला सांगितले.