राजा, रेणू बिबट्याची जोडी दाखल
By Admin | Updated: February 18, 2016 00:07 IST2016-02-18T00:04:49+5:302016-02-18T00:07:13+5:30
औरंगाबाद : सिद्धार्थ उद्यानाच्या प्राणिसंग्रहालयात मागील काही वर्षांपासून ‘नाझिया’ या मादीला नर नव्हता. त्यामुळे महापालिकेने देशभरातील प्राणिसंग्रहालयांमध्ये नर बिबट्याचा शोध घेणे सुरू केले होते.

राजा, रेणू बिबट्याची जोडी दाखल
औरंगाबाद : सिद्धार्थ उद्यानाच्या प्राणिसंग्रहालयात मागील काही वर्षांपासून ‘नाझिया’ या मादीला नर नव्हता. त्यामुळे महापालिकेने देशभरातील प्राणिसंग्रहालयांमध्ये नर बिबट्याचा शोध घेणे सुरू केले होते. हेमलकसा येथील प्राणिसंग्रहालयाने एक नर आणि एक मादी देण्याची तयारी दर्शविली. सर्व कागदोपत्री सोपस्कार करून बुधवारी सातवर्षीय राजा आणि चारवर्षीय रेणू या बिबट्याच्या जोडीला औरंगाबादेत आणण्यात आले.
केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाच्या निकषानुसार कोणत्याही मादीला किंवा नराला एकटे ठेवता येत नाही. सिद्धार्थ उद्यानात रॉयल बँगाल टायगर आणि बिबट्याला ठेवण्यासाठी पिंजरे उपलब्ध नव्हते. अलीकडेच दोन वाघ मध्यप्रदेशातील प्राणिसंग्रहालयास देण्यात आले. त्यानंतर गुडू या रॉयल बँगाल टायगरचा अचानक मृत्यू झाला.
उद्यानात वाघ आणि सिंहांची संख्या अचानक कमी झाली. नाझिया या मादीला नर मिळावा यासाठी मनपाने प्रयत्न सुरू केले. गडचिरोली येथील आमटे नॅशनल पार्कने बिबट्याची एक जोडी देण्याची तयारी दर्शविली. मनपाने १३ आॅगस्ट २०१५ रोजी केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरण यांच्याकडे प्रस्ताव दाखल केला. प्राधिकरणाने हिरवी झेंडी दाखविली. त्यानंतर नागपूरच्या मुख्य वनसंरक्षकांनी २ फेबु्रवारी रोजी बिबट्याच्या जोडीला औरंगाबादला हलविण्याची परवानगी दिली.
औरंगाबादहून डॉ. बी. एस. नाईकवाडे यांच्यासह पाच कर्मचाऱ्यांचे एक पथक चार दिवसांपूर्वीच गडचिरोलीच्या हेमलकसा येथे पोहोचले. बुधवारी सकाळी ८ वाजता राजा आणि रेणू या बिबट्याच्या जोडीला घेऊन औरंगाबादेत पोहोचले. प्रवासामुळे बिबट्याची जोडी बरीच थकली असून, सायंकाळी महापौर त्र्यंबक तुपे यांनी पाहणी केली. चार दिवस आराम केल्यावर या जोडीला पिंजऱ्यात सोडण्यात येणार आहे.