Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2025 16:10 IST2025-06-09T16:04:39+5:302025-06-09T16:10:32+5:30

Sonam Raghuwanshi : फॅक्टरीतील कामगारांना ही गोष्ट दिसत होती. पण प्रकरण एवढे पुढे जाईल असे त्यांना वाटले नव्हते.

अखेर इंदूरच्या राजा आणि सोनम रघुवंशी या नवविवाहित दाम्पत्याच्या बेपत्ता होण्याचा छडा लागला आहे. राजाची पत्नी सोनमच क्रूरकर्मा निघाली आहे. तिचे वडिलांच्याच प्लायवूडच्या फॅक्टरीमध्ये काम करणाऱ्या कामगारासोबत सूत जुळले होते. यातूनच या दोघांनी अन्य दोघांच्या मदतीने राजाचा काटा काढला आहे.

सोनमचा प्रियकर राज कुशवाह आता समोर आल्याने या दोघांची प्रेमकहाणी देखील चर्चेत येऊ लागली आहे. राज कुशवाह हा सोनमचे वडील देवी सिंह यांच्या प्लायवूड कारखान्यात काम करतो. सोनमपेक्षा तो पाच वर्षांनी लहान देखील आहे.

सोनम बऱ्याचदा फॅक्टरीमध्ये यायची. हिशेब आणि स्टाफच्या काही जबाबदाऱ्या ती सांभाळायची. या काळातच सोनम आणि राज यांच्यात सूत जुळले आणि दोघेही आडोशाला किंवा तिच्या केबिनमध्ये बोलताना दिसू लागले. फॅक्टरीतील कामगारांना ही गोष्ट दिसत होती. पण प्रकरण एवढे पुढे जाईल असे त्यांना वाटले नव्हते.

सोनम आणि राजच्या अफेअरबाबत पत्रकारांनी सोनमच्या वडिलांना विचारले तर त्यांनीही राजला ओळखतो असे सांगितले. तसेच तो राज कुशवाहा हाच आहे, हे सांगू शकत नाही म्हणाले. तो आपल्याकडे आधीही काम करायचा आणि आताही करतोय असे ते म्हणाले. म्हणजेच सोनमचे वडील या प्रेमप्रकरणाबाबत काहीच माहित नाही असे एकतर भासवत आहेत किंवा त्यांना काहीच माहिती नाहीय.

हत्या झालेला पती राजाच्या आईने सांगितले की सोनमने हनिमूनला जायचे ठरविले होते आणि तिनेच तिकीटे बुक केली होती. पोलिसांच्या तपासानुसार सोनमने जायची तिकीटे बुक केली खरी पण यायची केली नव्हती.या सर्वजणांनी २३ मे रोजीच राजाची हत्या केली आणि तिथूनच पळून गेले होते.

ललितपूर येथील १९ वर्षीय आकाश राजपूत याला सर्वात आधी अटक करण्यात आली. त्यानंतर इंदूर येथील २२ वर्षीय विशाल सिंग चौहान आणि त्यानंतर २१ वर्षीय राज सिंग कुशवाहा यांना अटक करण्यात आली. यानंतर लगेचच सोनमने सरेंडर केले.