खुलताबाद : खुलताबाद नगरपरिषदेने नुकतीच ई निविदा प्रसिद्ध केली आहे. दोन वर्षांपूर्वी पूर्ण केलेली विकासकामेही या निविदेत टाकून निधीचा अपहार करण्याचा प्रयत्न केला जात असल्याची तक्रार काँग्रेसचे गटनेते शेख अब्दुल हफीज व राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते मिर्झा अयाज बेग यांनी मुख्याधिकाऱ्यांसह जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, खुलताबाद नगरपरिषदेची ई निविदा २८ जून रोजी प्रसिद्ध झाली आहे. यात दोन ते तीन वर्षांपूर्वी खुलताबाद शहरात पूर्ण झालेल्या विकास कामांचाही समावेश करण्यात आला आहे. त्याचबरोबर या निविदेत वैशिष्ट्यपूर्ण योजना, रस्ता अनुदान योजना व जिल्हा नगरोत्थान योजना या तिन्ही योजनांना एकत्र करण्यात आल्याचा आरोप शेख अब्दुल हफीज, मिर्झा अयाज बेग यांनी केला आहे. शासनाच्या ३३-३३-३४ या नियमानुसार सुशिक्षित बेरोजगार अभियंता, मजूर सहकारी संस्था, नियमित ठेकेदार यांना काम मिळणे अपेक्षित आहे. मात्र, न.प.ने निविदा प्रसिद्ध केल्यापासून एकाच ठेकेदाराचा फायदा व्हावा, यासाठी तीनही योजना एकत्र केल्या आहेत. हे बेकायदेशीर असून प्रसिद्ध झालेली निविदा रद्द न केल्यास न्यायालयात दाद मागणार असल्याचा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे.
कोट
भाजप तालुका सरचिटणीसांनीही केली तक्रार
खुलताबाद नगरपरिषदेने नुकतीच प्रसिद्ध केलेली निविदा बेकायदेशीर व गैरप्रकार करण्यासाठी काढण्यात आली आहे. यात पूर्वी झालेल्या लाखो रुपयांच्या रस्त्यांची कामेही समाविष्ट केली असून भ्रष्टाचार करण्याचा हेतू असल्याचे स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे या निविदा रद्द करण्याची मागणी भाजपचे तालुका सरचिटणीस व माजी नगरसेवक अविनाश कुलकर्णी यांनीही निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी व न.प.च्या मुख्याधिकाऱ्यांकडे केली आहे.