जायकवाडीच्या पाण्याविषयी संभ्रम

By Admin | Updated: May 26, 2014 00:58 IST2014-05-26T00:48:55+5:302014-05-26T00:58:06+5:30

पाथरी : जायकवाडी धरणातील डाव्या कालव्यात आठ दिवसांपूर्वी पाणी सोडण्यात आले असले तरी या भागातील शेतकर्‍यांना मात्र हे पाणी मिळणार की नाही? याबाबत अद्यापही संभ्रम आहे.

Jaikwadi water confusion | जायकवाडीच्या पाण्याविषयी संभ्रम

जायकवाडीच्या पाण्याविषयी संभ्रम

पाथरी : जायकवाडी धरणातील डाव्या कालव्यात आठ दिवसांपूर्वी पाणी सोडण्यात आले असले तरी या भागातील शेतकर्‍यांना मात्र हे पाणी मिळणार की नाही? याबाबत अद्यापही संभ्रम आहे. उन्हाळ्याच्या सरतेशेवटी जायकवाडी विभागाने डाव्या कालव्यामध्ये पाणी सोडले आहे. या भागातील शेतकरी सुरुवातीपासूनच चार पाणीपाळी सोडा, अशी मागणी करीत होते. परंतु प्रशासनाने जायकवाडी धरणातील पहिली पाणी पाळी जानेवारी महिन्यामध्ये सोडली होती. त्यानंंतर मार्च आणि एप्रिल महिन्यात जायकवाडीचे पाणी सोडावे, अशी मागणी शेतकर्‍यांकडून करण्यात येत होती. परंतु प्रशासनाकडून याबाबत कोणताही निर्णय झाला नव्हता. आठ ते दहा दिवसांपूर्वी जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्यात पाणी सोडण्यात आले आहे. परंतु परभणी जिल्ह्यातील शेतकर्‍यांकडून पाणी मागणी अर्जच आले नसल्याचे कारण देऊन हे पाणी परभणी जिल्ह्याला देण्यात आले नाही. त्यामुळे हे सोडण्यात आलेले पाणी प्रत्यक्षात शेतकर्‍यांच्या शेतापर्यंत पोहोचेल की, नाही? याची शाश्वती नाही. याबाबत शेतकर्‍यांसोबत प्रशासनाने समन्वय न साधल्यामुळे पाणी मागणी अर्ज शेतकर्‍यांकडून गेले नाहीत. यामुळे या भागातील शेतकर्‍यांना चांगलाच फटका बसणार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Jaikwadi water confusion