अनुदान वाटपाची होणार चौकशी
By Admin | Updated: November 21, 2014 00:47 IST2014-11-21T00:42:07+5:302014-11-21T00:47:09+5:30
उस्मानाबाद : जिल्ह्यात मागील दोन ते तीन वर्षात आलेल्या नैसर्गिक आपत्तीमध्ये बाधित झालेल्या व्यक्तींना शासनाने लाखो रुपयांचे अनुदान वाटप केले

अनुदान वाटपाची होणार चौकशी
उस्मानाबाद : जिल्ह्यात मागील दोन ते तीन वर्षात आलेल्या नैसर्गिक आपत्तीमध्ये बाधित झालेल्या व्यक्तींना शासनाने लाखो रुपयांचे अनुदान वाटप केले. परंतु, प्रशासनाकडून या निधी वाटपाचे प्रयोगिता प्रमाणपत्र शासनास सादर करण्यात आले नाही. त्यामुळे लवकरच पथकामार्फत नैसर्गिक आपत्ती अंतर्गत वाटप केलेल्या अनुदानाची चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सुत्रांनी दिली.
जिल्ह्यात मागील दोन ते तीन वर्षात विविध नैसर्गिक आपत्तीवर मात करण्यासाठी शासनाच्या वतीने लाखो रुपये खर्च करण्यात आले. विशेष म्हणजे जिल्ह्यात सहा महिन्याखाली झालेल्या गारपीटीनंतर नुकसानग्रस्तांना कोट्यवधी रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली. परंतु, यातीलही काही शेतकऱ्यांना ही मदत मिळाली नसल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे आल्या होत्या. तसेच तुळजापूर तालुक्यात गारपीटीचे अनुदान वितरित करताना जास्तीचे क्षेत्र लावून संबधितांना लाभ मिळवून दिल्याचे उघड झाले होते. यामुळे काही अधिकारी व कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कार्यवाहीही करण्यात आली. याच अनुषंगाने जिल्ह्यात मागील दोन ते तीन वर्षात वाटप झालेल्या निधीची पडताळणी करण्यासाठी शासनाचे पथक येणार आहे. या अनुषंगाने विभागीय आयुक्तांनी जिल्हाधिकाऱ्यांना निधी वाटपाबाबतचे सर्व लेखे अद्यावत करण्याचे निर्देशही एका पत्रान्वये दिले आहेत. (प्रतिनिधी)