इंदिरा गांधींकडून विमानतळावर उमेदवारी मिळवलेले अशोकराव डोणगांवकर काळाच्या पडद्याआड
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2025 15:10 IST2025-07-05T15:06:00+5:302025-07-05T15:10:24+5:30
सरपंचपदापासून मंत्रिपदापर्यंत वाटचाल करणारे जेष्ठ नेते अशोकराव राजाराम पाटील डोणगांवकर यांचे वयाच्या ८२ व्या वर्षी निधन

इंदिरा गांधींकडून विमानतळावर उमेदवारी मिळवलेले अशोकराव डोणगांवकर काळाच्या पडद्याआड
छत्रपती संभाजीनगर : जेष्ठ नेते, माजी मंत्री अशोकराव राजाराम पाटील डोणगांवकर यांचे आज, शनिवारी ( दि. ५) सकाळी ११.५७ वाजता वयाच्या ८२ व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार उद्या, ६ जुलै रोजी त्यांच्या मूळगावी डोणगांव, ता. गंगापूर येथे सकाळी ११ वाजता होणार आहेत. त्यांच्या जाण्याने मराठवाड्यातील राजकारण, शिक्षण व विकासाची एक तेजस्वी वाटचाल थांबली आहे.
इंदिरा गांधींनी दिलेले ‘विमानतळ तिकीट’ ठरले आयुष्याचे वळणबिंदू
१९७७ मध्ये डोणगांव ग्रामपंचायतीचे सरपंच म्हणून त्यांनी राजकीय कारकिर्द सुरू केली. त्याच सुमारास वाळूज सर्कलमधून जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवड झाली. पण त्यांच्या आयुष्यातील मोठा टर्निंग पॉइंट म्हणजे १९८० साली तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याशी विमानतळावर झालेली ऐतिहासिक भेट. इंदिराजींनी त्यांची नेमकी कामगिरी पाहून त्यांना तिथेच काँग्रेसचे विधानसभा तिकीट जाहीर केले. आणि ते गंगापुर-खुलताबाद मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले.
राजकारणातून विकासाचे ध्येय गाठणारा नेता
१९८० ते १९८५ या कार्यकाळात त्यांनी गंगापुर-खुलताबाद तालुक्याच्या विकासासाठी क्रांतिकारी कामे केली. एस.टी. डेपो, औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI), नवीन तहसील कार्यालये, तसेच तालुक्याला जोडणारे मुख्य रस्ते, वीज, पाणी योजना यासाठी त्यांनी मोठ्या प्रमाणात निधी खेचून आणला. १९९५ मध्ये अपक्ष उमेदवार म्हणून निवडून येताना त्यांनी महाराष्ट्रात युती सरकार स्थापनेसाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. त्यानंतर सार्वजनिक बांधकाममंत्री म्हणून काम करताना त्यांनी नांदूर-मधमेश्वर कालव्याला चालना दिली, नागपूर-मुंबई महामार्ग, गंगापुर-भेंडाळा रस्ता आणि घृष्णेश्वर सहकारी साखर कारखाना यांसारख्या प्रकल्पांना वेग दिला.
शिक्षणप्रेमातून उभा राहिला ग्रामीण शिक्षणाचा आधार
१९८२ मध्ये त्यांनी मुक्तेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ स्थापन करून ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाचा पाया रचला. १९८३ साली लासुर स्टेशन येथे मुलींसाठी पहिले कन्या विद्यालय सुरू केले. आज या संस्थेच्या १० पेक्षा जास्त शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालये गंगापुर आणि खुलताबाद तालुक्यात यशस्वीपणे कार्यरत आहेत. १९९० मध्ये त्यांनी भगीरथी शिक्षण संस्था सुरू केली. दोन्ही संस्थांच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांचे भविष्य घडवले गेले. शिक्षणाविषयी त्यांची दृष्टी केवळ संस्थाचालकापुरती मर्यादित नव्हती, तर तो एक समाजप्रबोधनाचा प्रकल्प होता.
सामाजिक व राजकीय वारशाचा मोठा परिवार
त्यांच्या पश्चात पत्नी कुसुमताई डोणगांवकर, भाऊ रमेश पाटील (जिल्हा मजूर फेडरेशन चेअरमन), मुलगा किरण पाटील (जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष), आमदार मुलगी मोनिकाताई राजळे, मुलगा राहुल डोणगांवकर, मुलगी वैशाली सावंत व नातवंडे असा मोठा परिवार आहे, जो त्यांचा सामाजिक वारसा पुढे नेत आहे.