देशाचे पहिले दिव्यांग आयर्नमॅन निकेत दलाल यांचा हॉटेलच्या तिसऱ्या मजल्यावरून पडून मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2025 11:50 IST2025-07-02T11:50:02+5:302025-07-02T11:50:22+5:30
खोली पेटल्याने हॉटेलमध्ये राहण्यास गेले, कुटुंबाची पोलिसांना माहिती; पडल्याने दोन्ही हातांना गंभीर जखमा, तपासानंतर मृत्यूचे नेमके कारण कळेल

देशाचे पहिले दिव्यांग आयर्नमॅन निकेत दलाल यांचा हॉटेलच्या तिसऱ्या मजल्यावरून पडून मृत्यू
छत्रपती संभाजीनगर : देशाचे पहिले दिव्यांग आयर्नमॅन किताब पटकावणारे तसेच माजी उपमहापौर लता दलाल यांचे पुत्र निकेत श्रीनिवास दलाल (४३) यांचा कार्तिकी हॉटेलच्या तिसऱ्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला. मंगळवारी सकाळी ८:३० वाजता ही धक्कादायक घटना घडली.
निकेत कुटुंबासह खडकेश्वर परिसरात राहत होते. शासनाच्या समग्र शिक्षा अभियानाअंतर्गत प्रकल्पात ते नोकरीला होते. कुटुंबाने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री त्यांच्या घरात आगीची घटना घडली होती. त्यामुळे सामान जळून खोली राहण्यायोग्य नव्हती. परिणामी, निकेत रात्री हॉटेल कार्तिकी येथे राहण्यासाठी गेले. तिसऱ्या मजल्यावरील खाेली क्रमांक ३१७ मध्ये ते थांबले होते. सकाळी अचानक निकेत तिसऱ्या मजल्यावरून थेट खाली कोसळले. त्यांना तत्काळ घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. क्रांती चौक पोलिस ठाण्यात याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
दिव्यांग असूनही खेळात तरबेज
अंध असलेले निकेत खेळात तरबेज होते. जलतरणपटूसह ते उत्तम सायकलिंगदेखील करत होते. दुबईत फेब्रुवारी, २०२० मध्ये निकेत यांनी आयर्नमॅनचा किताब पटकावला होता. अशी कामगिरी करणारे ते भारताचे पहिले अंध आयर्नमॅन ठरले होते. आयर्नमॅन स्पर्धेची शर्यत ८ तास ३० मिनिटांत पूर्ण करणे आवश्यक असताना निकेत यांनी केवळ ७ तास ४४ मिनिटांत पूर्ण करत सर्वांनाच अचंबित केले होते. निकेत दलाल यांनी विविध राष्ट्रीय व राज्यस्तरीय स्पर्धेत जलतरणात पदक पटकावले होते. सायकलपटू असणाऱ्या निकेतने अनेक मॅरेथॉनमध्येही उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला होता. ते अभ्यासू स्पीच थेरेपिस्टदेखील होते.
दोन्ही हातांना गंभीर जखमा
प्राथमिक शवविच्छेदन अहवालात निकेत यांचा एक हात तुटला असून दुसऱ्या हाताला गंभीर जखम झाली आहे. त्यामुळे प्राथमिकदृष्ट्या ते खाली कोसळून मृत्यू झाल्याचा अंदाज आहे. तरीही शवविच्छेदनाचा अंतिम अहवाल व सखोल तपासानंतरच त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण कळेल, असे क्रांती चौक पोलिस ठाण्याचे निरीक्षक सुनील माने यांनी सांगितले. दरम्यान, निकेत यांच्या जाण्याने राजकीय, सामाजिक तसेच क्रीडा क्षेत्रातून अनेकांनी हळहळ व्यक्त केली. पुष्पनगरी स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.