औरंगाबाद : जिल्ह्यात ग्रामीण भागातील २,०१० शाळांत इयत्ता पाचवी ते आठवीचे वर्ग बुधवारपासून सुरू झाले, तर गुरुवारी या शाळांची संख्या १३८ वाढून २,१४८ झाली आहे, तर ग्रामीणमध्ये २० शाळा अद्याप सुरू होऊ शकल्या नाहीत. दुसऱ्या दिवशी विद्यार्थी उपस्थिती संख्या १८ हजार ८९८ ने वाढून ७४ हजार ८३७ झाली. एक हजार शिक्षकांना तपासणी अहवालाची प्रतीक्षा असून, आतापर्यंत ६ शिक्षक बाधित आढळून आल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले.
जिल्ह्यातील २,२१८ पैकी ग्रामीण भागात इयत्ता पाचवी ते आठवीच्या २,१६८ शाळा आहेत. त्यात २ लाख २० हजार ७८३ विद्यार्थी आहेत. त्यापैकी पहिल्या दिवशी बुधवारी सुरू झालेल्या २,०१० शाळांमध्ये ५५ हजार ९३९ विद्यार्थी उपस्थित होते. दुसऱ्या दिवशी हे प्रमाण वाढून २,१४८ शाळांत ७४ हजार ८३७ विद्यार्थी गुरुवारी उपस्थित होते. विद्यार्थ्यांचे प्रमाण दुसऱ्या दिवशी वाढले, तसेच दुसऱ्या दिवशी पालकांच्या संमतीपत्राची संख्याही वाढली आहे. पहिल्या दिवशी ६२ हजार ५४४ संमतीपत्रे शाळांकडे जमा झाली होती, तर गुरुवारी ही संख्या वाढून ७६ हजार ८४३ झाली. आणखी विद्यार्थी संख्या वाढेल, असे प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी सूरजप्रसाद जयस्वाल यांनी सांगितले. ७ हजार ८०६ पैकी ७,१३६ शिक्षकांची तपासणी पूर्ण झाली, तर ६,१४३ शिक्षकांचे अहवाल प्राप्त झाले आहेत. यात सहा शिक्षक बाधित आढळून आल्याने त्यांच्यावर उपचार सुरू आहेत, तर नववी ते बारावीची विद्यार्थी संख्याही वाढायला सुरुवात झाली असल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले.
शहरातील सहावी ते आठवीचे वर्गही बुधवारपासून सुरू झाले. त्यातील विद्यार्थी उपस्थिती, नेमक्या किती शाळांत वर्ग सुरू झाले याची आकडेवारी मनपाच्या शिक्षण विभागाकडून मनुष्यबळाअभावी संकलित होऊ शकली नाही. मनपा शाळांत पन्नास टक्के उपस्थिती असल्याचे सांगत चांगला प्रतिसाद मिळाल्याचे मनपाचे शिक्षणाधिकारी रामनाथ थोरे यांनी सांगितले.
---
स्कूल बस सुरू करण्याची गरज
जिल्ह्यात पाचवी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू झाल्या आहेत. केवळ शहरात पाचवीचा वर्ग सुरू करण्यात आला नाही. विद्यार्थांना ने-आण करण्यासाठी काही विद्यार्थ्यांच्या पालकांनी रिक्षांची मदत घेतल्याचे गुरुवारी दिसून आले. मात्र, शाळांच्या बस, स्कूल बस सुरू नसल्याने बहुतांश विद्यार्थ्यांच्या पालकांना विद्यार्थ्यांना शाळेत ने-आण करण्याची कसरत करावी लागली. त्यामुळे स्कूल बस सुरू करण्याची गरज असल्याचे शिक्षकांसह पालकांनी सांगितले.