वेरूळमध्ये इनामी जमिनी अधिकाऱ्यांच्या नातेवाईकांच्या नावे; विभागीय आयुक्तांचे चौकशीचे निर्देश
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2025 14:35 IST2025-08-25T14:26:41+5:302025-08-25T14:35:01+5:30
इनाम जमिनीवर कोट्यवधींचे कर्ज, वेरुळ जमीन खरेदी प्रकरणात बँकांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह

वेरूळमध्ये इनामी जमिनी अधिकाऱ्यांच्या नातेवाईकांच्या नावे; विभागीय आयुक्तांचे चौकशीचे निर्देश
छत्रपती संभाजीनगर : वेरुळ येथील गट क्र. ६८७ व ६८९ या गटातील वर्ग-२ च्या जागा महसूलमधील काही अधिकाऱ्यांच्या कुटुंबीयांच्या नावे खरेदी-विक्री झाल्याचे निदर्शनास येताच विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना चौकशी करण्यासाठी निर्देश दिले. येत्या आठवड्यात चौकशी समिती नेमणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
शासनाचे नियम डावलून झालेल्या या बेकायदेशीर प्रकाराची रिपाइं (आठवले गट) शहराध्यक्ष नागराज गायकवाड यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. गायकवाड यांनी विभागीय आयुक्तांकडे चौकशीची मागणी करण्यासाठी निवेदन दिले होते. विभागीय आयुक्तांनी चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला दिले.
वेरुळ येथील जुना सर्व्हे नं. २९८, गट क्र. ६८० ते ६९० ही इनामी जमीन होती. परंतु महसूल प्रशासनाला हाताशी धरून या गटामध्ये जागा अधिकाऱ्यांनी खरेदी केल्या. वर्ग २ मधून वर्ग १ मध्ये जमिनी केल्या गेल्या. यात शासनाने ठरवून दिलेल्या नियमांचे उल्लंघन झाले. कृषी आयुक्त रावसाहेब भागडे यांच्या पत्नी स्मिता रावसाहेब भागडे गट क्र. ६८७ मध्ये १० आर जमीन खरेदी व माजी अतिरिक्त जिल्हाधिकारी अण्णासाहेब शिंदे यांचा मुलगा आकाश अण्णासाहेब शिंदे यांच्या नावाने गट क्र. ६८९ मध्ये १३ आर जमीन खरेदी केली. रावसाहेब भागडे यांच्या पत्नी स्मिता भागडे यांच्या नावावर जिल्ह्यातील विविध ठिकाणी तब्बल १५ एकर ४४ गुंठे एवढी जमीन असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
बँकांनी दिले कोट्यवधींचे कर्ज
खुलताबादचे तहसीलदार स्वरूप कंकाळ यांनी दुय्यम निबंधकांना पत्र देऊन या गटातील जमिनीबाबत व्यवहार करण्यास बंदी घातली आहे. दरम्यान या गटांतील जमिनी या इनामी असताना या जमिनीवर इमारती बांधण्यासाठी बँकांनी कर्ज मंजुरी कशी दिली, असा प्रश्न आहे. काही बँकांनी कोट्यवधी रुपयांचे कर्ज दिले आहे.