छत्रपती संभाजीनगरात नागरी मित्र पथकाची सामान्य विक्रेत्यांवर गुंडगिरी, महिलांना धक्काबुक्की
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2025 20:07 IST2025-10-07T20:07:10+5:302025-10-07T20:07:32+5:30
विक्रेत्यांसह आमदार संजय केणेकर यांचा पोलिस आयुक्तालयात संताप, पथकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी

छत्रपती संभाजीनगरात नागरी मित्र पथकाची सामान्य विक्रेत्यांवर गुंडगिरी, महिलांना धक्काबुक्की
छत्रपती संभाजीनगर : नियमाच्या नावाखाली जाणीवपूर्वक सण, उत्सवाच्या काळात महानगरपालिकेचे नागरी मित्र पथकाचे कर्मचारी लष्करी गणवेशात सामान्य विक्रेते, व्यावसायिकांवर गुंडगिरी करत आहेत. महिला विक्रेत्यांना स्पर्श करून धक्काबुक्की करत असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या पथकावर गुन्हे दाखल करण्याच्या मागणीसाठी संतप्त महिला विक्रेत्यांसह आमदार संजय केणेकर यांनी सोमवारी पोलिस आयुक्तालयात काहीकाळ ठिय्या देत आंदोलन केले.
महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागात काही सेवानिवृत जवानांची नियुक्ती करण्यात आली आहे. काही दिवसांपासून शहरातील गुलमंडी, पैठणगेट, औरंगपुरा, शहागंज परिसरात हे पथक सातत्याने पथविक्रेते, व्यावसायिकांना पावत्या देत दंड आकारात आहेत. या पथकातील कर्मचाऱ्यांनी लष्करी गणवेशात अनेक व्यावसायिकांना धक्काबुक्की केली. काहींच्या मूर्ती तोडत साहित्याचे नुकसान केले. त्यांचा हा उन्माद सहन केला जाणार नाही. सण, उत्सवात व्यापाऱ्यांना जाणीवपूर्वक त्रास दिला जात असून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याच्या मागणीसाठी केणेकर यांनी सोमवारी पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांची भेट घेतली. या पथकामुळे तणाव निर्माण झाल्यास सर्वस्वी मनपा जबाबदार राहील. यात प्रामुख्याने अतिक्रमण विभागाचे जाधव व परदेशी यांच्यावर कारवाईची मागणी महिलांनी केली. या मागणीवर आयुक्त पवार यांनी दोन दिवसांत बैठक घेऊन योग्य कारवाईचे आश्वासन दिल्याचे केणेकर यांनी सांगितले.