छत्रपती संभाजीनगरमध्ये रिक्षात दगड भरून सुरू होती दंगलीची तयारी, पोलिसांमुळे टळला अनर्थ

By सुमित डोळे | Published: March 15, 2024 12:13 PM2024-03-15T12:13:34+5:302024-03-15T12:14:16+5:30

चिकलठाण्यात समाजकंटकांकडून तरुणांना फूस लावण्याचे प्रकार, ४८ तासात चार गुन्हे दाखल

In Chhatrapati Sambhaji Nagar, rickshaws were being filled with stones and riots were being prepared, disaster was averted by the police | छत्रपती संभाजीनगरमध्ये रिक्षात दगड भरून सुरू होती दंगलीची तयारी, पोलिसांमुळे टळला अनर्थ

छत्रपती संभाजीनगरमध्ये रिक्षात दगड भरून सुरू होती दंगलीची तयारी, पोलिसांमुळे टळला अनर्थ

छत्रपती संभाजीनगर : चिकलठाण्यात धार्मिक स्थळांमधील प्रार्थनेच्या आवाजावरून मंगळवारी निर्माण झालेला तणाव बुधवारी रात्रीपर्यंत कायम राहिला. स्थानिकांसह काही संघटनांनी बुधवारी रात्री ८ वाजता महाआरतीचे आयोजन केले होते. आरतीसाठी जाणाऱ्या तरुणांना मारहाण झाल्याचा आरोप आहे. याच ठिकाणी एक रिक्षा (एम एच २० - ई एफ - ६८७२) आणून त्यात दगड भरून गंभीर घटनेसाठी कट रचला जात होता, अशी धक्कादायक माहिती समोर आली. पोलिसांनी धाव घेताच रिक्षा सोडून दगड भरणाऱ्या दंगेखोरांनी पळ काढला. याप्रकरणी पोलिसांनी रात्री उशिरा रिक्षा जप्त करत स्वतंत्र गुन्हा दाखल केला.

धार्मिकस्थळातील आरतीचा आवाज कमी करण्याच्या मागणीवरून मंगळवारी रात्री वाद उफाळून आला. चर्चेदरम्यानच एका गटाने महिला, स्थानिकांना मारहाण केल्याने तणाव वाढला. परिणामी, अर्ध्या तासात चिकलठाण्यात दंगलसदृश परिस्थिती निर्माण झाली. बुधवारी याच ठिकाणी पुन्हा महाआरती करण्यात आली, तेव्हा मोठी घोषणाबाजी झाली. परिणामी, परिसरात पुन्हा तणाव झाला. रात्री ११ वाजेपर्यंत जमावाला पांगवून परिसर शांत करण्यासाठी पोलिसांना कसरत करावी लागली.

दगड गोळा करण्यासाठी कोणी दिली चिथावणी?
पुष्पक गार्डन परिसरात तरुण घसरून पडल्यानंतर धिंगाणा सुरू झाल्याचे कळताच उपनिरीक्षक आत्माराम घुगे, सचिन जाधव यांनी धाव घेतली. शांततेचे आवाहन केले. मात्र, तरीही दगडफेक केली गेली. पोलिसांनी पुन्हा सौम्य लाठीमार केला. तेव्हा काही अंतरावर तरुण लाठ्याकाठ्यांसह जमाव जमवण्याचा प्रयत्न करत होते. तर काहींनी रिक्षा आणून त्यात दगड भरण्यास सुरुवात केली. पोलिसांना तिकडे धाव घेताच दगड भरणाऱ्यांनी पळ काढला. वरिष्ठांच्या आदेशावरून सहायक फौजदार ज्ञानेश्वर सोनार यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला.

अटकेबाबत भूमिका सावधच
या संपूर्ण घटनेप्रकरणी एमआयडीसी सिडको ठाण्यात ४८ तासात एकूण ४ गुन्हे दाखल झाले. आरतीच्या आवाजावरून मारहाण केल्याप्रकरणी कृष्णा नागे याच्या तक्रारीवरून लैला नावाची महिला, शकील जैनोद्दीन शेख, अखिल जैनोद्दीन शेख, अनिस जैनोद्दीन शेख यांच्यासह १५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी सरकारी पक्षातर्फे जमावावर दंगलीचा दुसरा गुन्हा दाखल केला. तर एका महिलेच्या तक्रारीवरून रमेश दहिहंडे, कृष्णा नागे, बाबुराव जाधवसह एकूण ७ जणांवर तिसरा तर बुधवारच्या रात्रीच्या तणावाप्रकरणी चौथा गुन्हा दाखल झाला. अटकेबाबत मात्र पोलिसांनी सावध भूमिका घेतली आहे. गुरुवारी सायंकाळपर्यंत कोणालाही अटक नव्हती.

तरुणांना फूस लावण्याचे प्रकार
समाजकंटकांकडून तरुणांना फूस लावण्याचे प्रकार सुरू असल्याचे तपासात निष्पन्न झाले. काही संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या घोषणाबाजी व आडमुठ्या भुमिकेमुळे देखील तणाव वाढल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले. रमजानमधील पहिला शुक्रवार उद्या आहे. शिवाय चिकलठाण्यात आठवडी बाजार देखील भरणार आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात खरेदीदार घराबाहेर पडतील. यादरम्यान अनुचित प्रकार घडू नये यासाठी एसआरपीएफ व स्थानिक पोलिसांनी परिसरातून रुट मार्च काढला.

Web Title: In Chhatrapati Sambhaji Nagar, rickshaws were being filled with stones and riots were being prepared, disaster was averted by the police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.