ट्रॅव्हलच्या उघड्या डिक्कीने रिक्षा कापून काढला, दोघींचा मृत्यू; छत्रपती संभाजीनगरातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2025 13:52 IST2025-11-19T13:43:10+5:302025-11-19T13:52:09+5:30
बस चालकाच्या बेपर्वाईमुळे भीषण अपघात; महिला भाविकांवर परतीच्या प्रवासात काळाचा घाला

ट्रॅव्हलच्या उघड्या डिक्कीने रिक्षा कापून काढला, दोघींचा मृत्यू; छत्रपती संभाजीनगरातील घटना
छत्रपती संभाजीनगर: धार्मिक दर्शनासाठी मध्य प्रदेशातील सिहोर येथे गेलेल्या वाळूज येथील सात महिला भाविकांचा परतीचा प्रवास अत्यंत दुर्दैवी ठरला आहे. रेल्वे स्टेशनवरून पहाटे घरी परतताना पंचवटी चौकात रिक्षाला खासगी ट्रॅव्हल बसची धडक बसली. यावेळी बसच्या उघड्या डिक्कीने रिक्षाचा मागील भाग अक्षरशः कापून निघाला आहे. या भीषण अपघातात दोघींचा जागीच मृत्यू झाला, तर दोघी गंभीर जखमी झाल्या आहेत.
वाळूज येथील सात महिला भाविक सिहोर येथे प्रदीप मिश्रा यांच्या दर्शनासाठी गेल्या होत्या. मंगळवारी दुपारी त्या तेथून निघून पहाटे अडीच वाजता छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशनवर पोहोचल्या. स्टेशनवरून एका रिक्षाने या सात महिला वाळूजकडे निघाल्या होत्या. रिक्षा पंचवटी चौकात थांबला असताना, याचवेळी उजव्या बाजूची डिक्की उघडी असलेली एक खासगी ट्रॅव्हल बस विरुद्ध दिशेने वेगाने आली. बस चालकाने बेजबाबदारपणे आणि वेगाने वळण घेतल्यामुळे बसच्या उघड्या डिक्कीचा दरवाजा रिक्षाच्या मागच्या बाजूस जोरदार धडकला. मागची बाजू कापत बस वेगाने पुढे गेली. मात्र या भीषण धडकेत रिक्षाच्या मागे बसलेल्या चौघी महिला गंभीर जखमी झाल्या. त्यातील आशाबाई राजु चव्हाण आणि लत्ता बाई परदेशी या दोघींचा जागीच मृत्यू झाला.
घाटी रुग्णालयात उपचार सुरू
इतर दोन गंभीर जखमी महिलांवर तातडीने घाटी रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत. यावेळी मधल्या सीटवर बसलेल्या तीन महिला किरकोळ जखमी झाल्या आहेत. पोलिसांनी चालक आणि क्लीनरला ताब्यात घेतले आहे. या घटनेमुळे छत्रपती संभाजीनगरात एकच खळबळ उडाली.