औरंगाबाद : शहरात चोरट्या मार्गाने गुटखा आणला जातो आणि विकलाही जातो हे आता नवीन राहिलेले नाही. शहरातील विविध पानटपऱ्यांवर गुटखा मिळत असल्याचे अनेकदा समोर आले. ब्रेक दी चेनमध्ये केवळ किराणा दुकान सुरू असल्याने आता किराणा दुकानातून गुटखा विक्री सुरू झाल्याची माहिती सूत्राने दिली.
कोरोना महामारीचा संसर्ग रोखण्यासाठी औरंगाबाद शहरात आणि ग्रामीण भागात ब्रेक दी चेन अंतर्गत किराणा दुकान वगळून सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत. ब्रेक दी चेन अंतर्गत पानटपऱ्या बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे गुटखा माफियांनी त्यांचा मोर्चा किराणा दुकानदारांकडे वळविल्याचे सूत्रांनी सांगितले. परिणामी शहरातील गुटख्याची आवक कायम आहे. अशाच प्रकारे शहरात आणला जाणारा लाखो रुपयांचा गुटखा ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखा आणि जिन्सी पोलिसांनी वेगवेगळ्या कारवाईत गत सप्ताहात जप्त केला. पोलिसांची नजर चुकवून गुटखा किराणा दुकानदारापर्यंत पोहचविला जातो. शहरातील प्रत्येक वसाहतीमधील गल्लीबोळातील किराणा दुकानात आता सहज गुटखा विकला जात आहे. गुटखा विक्री करताना पोलिसांकडून कारवाईचा धोका असतो, ही बाब लक्षात घेऊन मोठे किराणा दुकानदार मात्र गुटखा विक्री करीत नाही.
धाड पडणार नाही याची हमीकिराणा दुकानदारांना गुटखा विक्रीसाठी प्रवृत्त करताना पोलिसांची तुमच्यावर धाड पडणार नाही, अशी हमी गुटखामाफिया देतात, असे सूत्रांनी सांगितले. परिणामी गुटखा विक्रेते किराणा दुकानदार आणि शहरातील पानटपऱ्यावर गुटखा विक्रीच्या केसेस पोलीस आणि अन्न व औषधी प्रशासनाकडून होताना दिसत नाही.