चारा संपला, प्रशासन सुस्त !

By Admin | Updated: July 12, 2015 00:45 IST2015-07-12T00:39:55+5:302015-07-12T00:45:10+5:30

हरी मोकाशे ,लातूर गेल्या वर्षी अल्प पर्जन्यमान झाल्याने आणि यंदा पावसाने दडी मारल्याने पशूधनाच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर झाला आहे़ जिल्ह्यात उपलब्ध असलेला

Fodder is over, administration dull! | चारा संपला, प्रशासन सुस्त !

चारा संपला, प्रशासन सुस्त !


हरी मोकाशे ,लातूर
गेल्या वर्षी अल्प पर्जन्यमान झाल्याने आणि यंदा पावसाने दडी मारल्याने पशूधनाच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर झाला आहे़ जिल्ह्यात उपलब्ध असलेला ७ लाख ८२ हजार ६४७ मे़ टन चारा संपुष्टात आला आहे़ परिणामी, पशूधनाच्या दावणीला ऊसाचे वाळलेले पाचट टाकले जात आहे़ जीवापाड सांभाळलेले पशूधन आता जगवायचे कसे असा यक्ष प्रश्न पशूपालकांसमोर असताना जिल्हा प्रशासन मात्र सुस्त असल्याचे पहावयास मिळत आहे़ त्यामुळे जिल्ह्यातील पशूधन संख्या घटण्याची भिती व्यक्त होत आहे़
जिल्ह्यात गेल्या वर्षी विलंबाने व अल्प पर्जन्यमान झाले़ त्यामुळे शेतकऱ्यांना खरीप हंगाम अपेक्षितरित्या साधला नाही़ रबी तरी पदरी पडेल अशी शेतकऱ्यांनी आशा होती़ परंतु, वरुणराजाने पाठ फिरविल्याने त्या आशेवर पाणी फिरले़ पाऊसच नसल्याने रबी हंगामातून दरवर्षीच्या तुलनेत अल्प चारा उपलब्ध झाला़ तो म्हणजे केवळ १ लाख ५ हजार ३०१ मे़ टन होय़ जिल्ह्यात लहान पशूधनाची संख्या १ लाख ४४ हजार ९३२ तर मोठ्या पशूधनाची संख्या ४ लाख ५५ हजार २१८ अशी आहे़
जिल्ह्यातील पशूधनास दररोज ३ हजार १६६ किलो चारा लागतो़ जिल्ह्यास वार्षिक चारा ११ लाख ३९ हजार ७९७ मे़ टन लागतो़ त्याच्या तुलनेत जिल्ह्यात उन्हाळ्याचा अखेरपर्यंत केवळ ७ लाख ८२ हजार ६४७ मे़ टन चारा उपलब्ध झाला होता़ यंदा वेळेवर पाऊस होईल, या आशेने पशूपालकांनी भर उन्हाळ्यात मोठ्या कष्टाने पशूधन सांभाळले़ मृग नक्षत्राच्या प्रारंभी उदगीर, जळकोट, रेणापूर या तालुक्यांत पावसाच्या चांगल्या सरी झाल्या़ जिल्ह्यात जून अखेरपर्यंत सरासरी ८७़५८ मिमी पाऊस झाला तर जुलैत आजपर्यंत ८़८२ मिमी झाला आहे़
दरवर्षी जुलैमध्ये माळराने हिरवीगार दिसतात़ परंतु, यंदा पाऊसच नसल्याने माळराने ओसाड दिसून येत आहेत़ त्यामुळे पशूधनास हिरवा चारा उपलब्ध नाही़ कडबाही संपुष्टात आल्याने पशूपालक धास्तावला आहे़ जीवापाड सांभाळलेले पशूधन आता कसे जगवायचे असा प्रश्न सतावत आहे़ जिल्हा प्रशासन मात्र कुठलीही ठोस उपाययोजना करीत नसल्याचे दिसून येत आहे़ परिणामी, जिल्ह्यातील पशूधन संख्या घटण्याची भिती व्यक्त होत आहे़
चारा संपुष्टात आला आहे़ त्यामुळे पशूपालक चिंतातूर झाले आहे़ चारा छावणी संदर्भात प्रस्ताव महसूलच्या अधिकाऱ्यांमार्फत मागविण्यात येत आहेत, असे पशूसंवर्धन विकास अधिकारी डॉ़ एल़ एस़ पवार यांनी सांगितले़

Web Title: Fodder is over, administration dull!