जुन्या वादातून भररस्त्यात कोयत्याने वार करून हत्या; बाप-लेकाला मरेपर्यंत कारावासाची शिक्षा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2026 12:35 IST2026-04-18T12:35:03+5:302026-04-18T12:35:42+5:30
पत्नी आणि मुलासमोरच केला होता पतीचा खून; सत्र न्यायाधीश आर.डी. खेडेकर यांनी सुनावली जन्मठेप

जुन्या वादातून भररस्त्यात कोयत्याने वार करून हत्या; बाप-लेकाला मरेपर्यंत कारावासाची शिक्षा
छत्रपती संभाजीनगर : जुन्या वादातून सुनील चौधरी (रा. चौधरी गावणी, ता. सोयगाव) यांच्या खुनाच्या आरोपाखाली सत्र न्यायाधीश आर.डी. खेडेकर यांनी ज्ञानेश्वर रामदास चौधरी (५०) आणि हेमंत ज्ञानेश्वर चौधरी (२१, दोघे रा. सोयगाव) या बाप-लेकास जन्मठेप आणि प्रत्येकी २५ हजार रुपये दंड ठोठावला.
काय होती घटना?
मनीषा सुनील चौधरी (३४, रा. चौधरी गवणी, ता. सोयगाव) यांच्या फिर्यादीनुसार, फिर्यादी व त्यांचे पती सुनील चौधरी १७ जुलै २०२१ रोजी सायंकाळी शेतातील काम आटोपून दुचाकीने घरी परतत होते. त्यांचा मुलगा कार्तिक सायकलवरून मागून येत होता. लिहातांडा ते सोयगाव रस्त्यावर ज्ञानेश्वर चौधरी व त्याचा मुलगा हेमंत यांनी त्यांना अडवले. जुन्या भांडणाच्या कारणावरून दोघांनी शिवीगाळ करीत दोघांवर हल्ला केला.
ज्ञानेश्वरने हातातील कोयत्याने सुनील चौधरी यांच्या डोक्यावर जोरदार वार केला. त्यानंतर खाली कोसळलेल्या सुनील चौधरी यांना हेमंत चौधरी याने गळा व चेहऱ्यावरही वार करीत गंभीर जखमी केले. पतीला वाचविण्यासाठी मनीषा चौधरी आल्या असता ‘तुम्ही जास्त माजले, तुम्हाला मस्ती आली, आता तुम्हाला जिवंत सोडत नाही,’ असे म्हणत ज्ञानेश्वरने कोयत्याने त्यांच्यावरही वार केले. त्यांच्या हातावर व पाठीवर मार लागला. हल्ल्यानंतर सुनील चौधरी रक्ताच्या थारोळ्यात बेशुद्ध पडले. स्थानिकांच्या मदतीने जखमींना तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती खालावल्याने त्यांना जळगावच्या सिव्हिल हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले असता उपचारादरम्यान सुनील यांचा मृत्यू झाला. याबाबत सोयगाव ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
खटल्याची सुनावणी व आदेश
खटल्याच्या सुनावणीवेळी सहायक लोकअभियोक्ता बाळासाहेब महेर यांनी ११ साक्षीदारांचे जबाब नोंदवले. त्यात सिव्हिल हॉस्पिटलचे डॉक्टर व फिर्यादी यांची साक्ष महत्त्वाची ठरली. सुनावणीअंती न्यायालयाने वरील दोघा आरोपींना दोषी ठरवून भादंवि कलम ३०२ अन्वये जन्मठेप व प्रत्येकी २५ हजार रुपये दंड आणि कलम ५०६ सह ३४ अन्वये प्रत्येकी ५ वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली. आरोपींना दोन्ही शिक्षा एकत्र भोगावयाच्या आहेत. पैरवी अधिकारी म्हणून हवालदार नितीन जाधव यांनी काम पाहिले.