शेतकऱ्याची लग्नाच्या नावाखाली लूट; ३ लाख घेऊन लग्न, सासरी जाताना अर्ध्या रस्त्यातून वधू पसार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2025 20:00 IST2025-12-03T19:54:52+5:302025-12-03T20:00:15+5:30
नवऱ्या मुलाच्या कारमधून वधू स्वत: उतरून गेली पळून; रॅकेटमध्ये वधू अन तिची आईही सामील!

शेतकऱ्याची लग्नाच्या नावाखाली लूट; ३ लाख घेऊन लग्न, सासरी जाताना अर्ध्या रस्त्यातून वधू पसार
वाळूज महानगर : लग्न जुळवण्यासाठी ३ लाख रुपये घेतले व कोर्टात नोटरीद्वारे लग्न केल्यानंतर सासरी निघालेल्या नवरीने अर्ध्या रस्त्यातून धूम ठोकल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी (दि.१) बजाजनगर येथे उघडकीस आला. अहिल्यानगर जिल्ह्यातील २९ वर्षीय शेतकरी अशोक बांदल यांची या प्रकारात फसवणूक करण्यात आली.
अशोक बांदल यांचे वधू संशोधन सुरू होेते. या काळात अरविंद राठोड याच्याशी दोन महिन्यांपूर्वी त्यांची भेट झाली. लग्नाची इच्छा व्यक्त केल्यावर अरविंदने त्यांच्या गावाकडे चांगल्या मुलींची स्थळे असल्याचे सांगितले. त्याने व्हॉट्स ॲपवर दोन ते तीन मुलींचे फोटोही पाठवले. त्यापैकी माया शिंदे नावाची मुलगी अशोकने पसंत केली. मुलीचे वडील वारले असून ती आई आणि भावासोबत राहते व कंपनीत नोकरी करते, अशी माहिती अरविंदने दिली तसेच तिच्याशी लग्न करण्यासाठी ३ लाख रुपये स्त्रीधन द्यावे लागेल, अशी अट घातली.
कोर्टात जाऊन नोटरी केली...
मुलगी पसंत असल्याने अशोकने यास होकार दर्शवला. नियोजित दिवशी (दि.३० नोव्हेंबर) दुपारी १ वाजता अशोक बांदल, त्याचा चुलतभाऊ आणि इतर नातेवाईक बजाजनगरातील अयोध्यानगरात सविता शिंदे यांच्या घरी गेले. तेथे मुलगी बघण्याचा कार्यक्रम झाला. मुला-मुलीची पसंती झाल्यानंतर छत्रपती संभाजीनगरातील कोर्टात वकील शैला लालसरे यांच्या उपस्थितीत १०० रुपयांच्या स्टॅम्पपेपरवर नवरदेव-नवरी स्वखुशीने विवाह करत असल्याची नोटरी केली. त्यानंतर ते सर्वजण पुन्हा सविता शिंदे यांच्या घरी परतले. ठरल्यानुसार अशोक बांदलने १ लाख ४५ हजार रुपये फोन पे द्वारे आणि १ लाख ५५ हजार रुपये रोख असे ३ लाख रुपये दिले.
अर्ध्या रस्त्यातून वधू पसार
पैसे मिळाल्यानंतर मुलीची आई सविता शिंदे यांनी “माया हिला तुम्ही आजच सोबत घ्या, उद्या गावाकडे लग्न लावून घेऊ” असे सांगितले. त्यानुसार मायाला कारमध्ये बसवून ते निघाले. काही अंतरावर गेल्यानंतर पाठीमागून विना क्रमांकाची पांढरी कार (आय-२०) आली. अचानक ओव्हरटेक करून आडवी लावली. त्या कारमधून चौघेजण उतरले. बांदलच्या कारमधून माया उतरली आणि त्या आय-२० कारमध्ये बसली. काही क्षणात कार गायब झाली.
वधू, तिची आई सर्वच पसार
अशोकने तत्काळ मायाला फोन लावला, मात्र तिचा फोन बंद होता. तो तिच्या घरी गेला असता घराला कुलूप होते. आई-सविताचा फोनही बंद होता तेव्हा फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाले. बांदल यांनी वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. आरोपी अरविंद राठोड, गुड्डा राठोड, सविता मधुकर शिंदे आणि माया मधुकर शिंदे यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला. पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक रामेश्वर गाढे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस उपनिरीक्षक अरविंद शिंदे करत आहेत.