पर्यावरणपूरक पर्याय; औरंगाबादकरांचा कल वाढतोय ‘बायोवेस्ट’कडे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2019 08:22 PM2019-06-01T20:22:51+5:302019-06-01T20:23:03+5:30

हॉटेल आणि मॉल संस्कृतीने घेतला पुढाकार, प्लास्टिकला पर्याय म्हणून पाहिले जातेय

Eco-friendly options; Aurangabadkar's trend towards BioVest! | पर्यावरणपूरक पर्याय; औरंगाबादकरांचा कल वाढतोय ‘बायोवेस्ट’कडे!

पर्यावरणपूरक पर्याय; औरंगाबादकरांचा कल वाढतोय ‘बायोवेस्ट’कडे!

googlenewsNext

- अबोली कुलकर्णी  
औरंगाबाद : मध्यंतरी दैनंदिन वापरातील प्लास्टिकला बंदी घालण्यात आली. त्यानंतर प्लास्टिकला पर्याय म्हणून कापडी वस्तूंचे प्रमाण वाढले. आता औरंगाबादेत नवा पर्यावरणपूरक कल रुजू पाहतोय, तो म्हणजे ‘बायोवेस्टचा’. ऊस, मका, सुपारी या झाडांच्या विविध भागांचा वापर करून रोजच्या वापरातील बनलेल्या उपयोगी वस्तू उपलब्ध झाल्या आहेत. या पर्यावरणपूरक वस्तूंचा वापर मोठमोठी हॉटेल्स आणि मॉल संस्कृतीमध्ये मोठ्या प्रमाणावर केला जात आहे, तसेच लग्नकार्यातही अशा ‘बेस्ट आऊट आॅफ वेस्ट’ वस्तूंची मागणी वाढताना दिसते आहे. 

दैनंदिन आयुष्यात प्लास्टिकचा होणारा वापर बंद झाला आहे. पर्यावरण आणि आरोग्याच्या दृष्टीने हानिकारक म्हणून शासनाने त्यावर बंदी आणली. हा बदल स्वीकारत सर्वसामान्य लोकांनी पर्यायी कापडी, कागदी पिशव्यांचा वापर सुरू केला, तसेच विविध बचत गटांच्या माध्यमातूनही कापडी पिशव्या बनवण्यात येऊ लागल्या. आता शहरात उसाच्या चोथ्यापासून बनवल्या जाणाऱ्या प्लेटस्, चमचे, स्ट्रॉ, वाट्या या इकोफ्रेंडली वस्तूंची मागणी वाढते आहे. सुपारीची पाने, मक्याच्या कणसाच्या आतील भागापासूनदेखील या वस्तू बनवता येतात. लाकडाच्या वस्तूंपेक्षा काही प्रमाणात महाग असल्या तरीही काही ठराविक वर्गात त्यांची मागणी दिसून येते. मुंबई, पंजाब येथून या वस्तूंची शहरात आयात होत असून, प्लास्टिकला पर्याय म्हणून या नव्या इकोफ्रेंडली बायोवेस्ट ट्रेंडबद्दल औरंगाबादेत जागरूकता निर्माण होताना दिसते आहे. 

मॉल्समध्ये कागदी बॅग्स आणि गृहोपयोगी वस्तूंचा वापर
मॉल्सची खरेदी सर्वसामान्यांना न परवडणारी असते, असा एक समज आहे; पण मॉलमध्ये होणाऱ्या विविध बैठका, कॉन्फरन्सेस यांच्यामध्ये आक र्षक कागदी बॅग्सचा वापर वाढला आहे, तसेच विविध खाद्यस्टॉल्सवरदेखील कागदी चमचे, मक्याच्या कणसापासून बनलेले चमचे, वाट्या यांचा वापर वाढला आहे. सर्वसामान्यांमध्ये जागरूकता आणण्यासाठी मॉल्सनी पुढाकार घेतला आहे.

लग्नकार्यात बायोवेस्ट ठरतोय ‘स्टेटस सिम्बॉल’
लग्नकार्यात वापरण्यात येणाऱ्या प्लेटस्, पत्रावळी, ग्लास, वाट्या यांच्याऐवजी बायोवेस्ट म्हणून बनवल्या जाणाऱ्या वस्तंूचा वापर वाढला आहे. वधूपित्याकडून अशा प्रकारच्या वस्तूंची मागणी वाढताना दिसत आहे. मका, ऊस आणि सुपारीपासून बनवण्यात येणाऱ्या वस्तू कागदी वस्तूंपेक्षा काहीशा महाग असल्याने यांना ‘स्टेटस सिम्बॉल’चे रूप आले आहे. 

इकोफ्रेंडली पर्यायांचा वापर काळाची गरज
ग्राहक म्हणजे केवळ उपभोक्ता नव्हे, तर ग्राहक हा सृष्टीचक्रातील एक जबाबदार घटक आहे. पैसा आहे म्हणून काहीही विकत घेण्यापेक्षा पर्यावरणाचा विचार प्रत्येकाने केलाच पाहिजे. सुदैवाने आज बाजारात प्लास्टिकऐवजी ‘युज अ‍ॅण्ड थ्रो’ प्रकारात अनेक इकोफे्रंडली दर्जेदार पर्याय उपलब्ध आहेत. ते आपण आग्रहाने वापरले पाहिजेत.
- संगीता धारूरकर 

Web Title: Eco-friendly options; Aurangabadkar's trend towards BioVest!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.