दुष्काळी स्थितीमुळे उसाच्या क्षेत्रात घट
By Admin | Updated: September 21, 2014 00:25 IST2014-09-21T00:04:28+5:302014-09-21T00:25:21+5:30
पारगाव : वाशी तालुक्यातील पारगाव व परिसरात गत तीन-चार वर्षातील दुष्काळी स्थितीमुळे उसाच्या क्षेत्रात मोठी घट झाली आहे़ पाण्याअभावी २२५़५० हेक्टरचे क्षेत्र ८० हेक्टरावर आले

दुष्काळी स्थितीमुळे उसाच्या क्षेत्रात घट
पारगाव : वाशी तालुक्यातील पारगाव व परिसरात गत तीन-चार वर्षातील दुष्काळी स्थितीमुळे उसाच्या क्षेत्रात मोठी घट झाली आहे़ पाण्याअभावी २२५़५० हेक्टरचे क्षेत्र ८० हेक्टरावर आले असून, नापिकीमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे़ तर गाळपासाठी लागणारा उपलब्ध ऊस आपल्याच कारखान्यात गाळप व्हावा, यासाठी कारखानदारांची मोठी धावपळ सुरू आहे़
गत काही वर्षापूर्वी पारगाव व परिसरातील शेतकरी नगदी पीक म्हणून उसाची मोठ्या प्रमाणात लागवड करीत होते़ मांजरा नदीपात्रामुळे परिसरातील जलस्त्रोताची पाणीपातळीही चांगली राहत होती़ परिसरातील जवळपास ७० टक्के शेतकऱ्यांनी उसाची लागवड केल्याने कारखानदारही या परिसरातील उसाची तोड करण्यासाठी धावपळ करीत होते़ या परिसरातील ऊस पारगाव येथील भिमाशंकर शुगर, वाशी येथील शिवशक्ती सहकारी साखर कारखाना, सोनारी येथील भैरवनाथ शुगर्स, शहागड येथील समर्थ सहकारी साखर कारखाना, रांजणी येथील नॅचरल शुगर, हावरगाव येथील शंभू महादेव आदी कारखान्यात गाळपासाठी नेण्यात येत होता़ मात्र, या परिसरात असलेले २२५़५० हेक्टरवरील उसाचे क्षेत्र पावसाअभावी केवळ ८० टक्क्यांवर आले आहे़ पाण्याअभावी उसाचे उत्पन्न घटल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत आले आहेत़ तर उपलब्ध ऊस आपल्याच कारखान्यात काळपासाठी न्यावा, यासाठी कारखानदारांना पूर्वीपेक्षाही अधिक धावपळ करावी लागणार असल्याचे चित्र निर्माण झाला आहे़ शिवाय उसाअभावी अनेक कारखान्याचे बॉयलर पेटेल की नाही हा प्रश्नही कायम आहे़ (वार्ताहर)