१२ तासांच्या प्रयत्नानंतर सापडला चालकाचा मृतदेह

By Admin | Updated: September 4, 2014 01:25 IST2014-09-04T01:09:36+5:302014-09-04T01:25:14+5:30

येणेगूर : उमरगा तालुक्यातील महालिंगरायवाडी शिवारातील विहिरीत बुडालेल्या ट्रकचालकाचा मृतदेह बाहेर काढण्यासाठी प्रशासनाला तब्बल १२ तास दमछाक करावी लागली़

Driver's body found after 12 hours of attempt | १२ तासांच्या प्रयत्नानंतर सापडला चालकाचा मृतदेह

१२ तासांच्या प्रयत्नानंतर सापडला चालकाचा मृतदेह


येणेगूर : उमरगा तालुक्यातील महालिंगरायवाडी शिवारातील विहिरीत बुडालेल्या ट्रकचालकाचा मृतदेह बाहेर काढण्यासाठी प्रशासनाला तब्बल १२ तास दमछाक करावी लागली़ ७४ फूट पाण्याचा उपसा केल्यानंतर रात्री अग्निशमन दलाच्या जवानांनी विहिरीत उतरून चालकाचा मृतदेह बाहेर काढला़
येणेगूर येथील ट्रकचालक काशिनाथ जगताप व त्याचे सहकारी तन्वीर शेख, तुकाराम घुमटे हे तिघे महालिंगरायवाडी शिवारातील शेतातील विहिरीत पोहण्यासाठी गेले होते़ तिघांनी विहिरीत उडी मारली़ मात्र, काशिनाथ जगताप हे वर आले नाहीत़ थोडावेळ वाट पाहून त्या दोघांनी काशिनाथची आई चंचला जगताप यांना माहिती दिली़ चंचला जगताप यांनी या घटनेची खबर येणेगूर दूरक्षेत्राला देताच सपोनि सोपान शिरसाट, पोहेकॉ गोरोबा कदम, कैलास चाफेकर आदींनी घटनास्थळी धाव घेवून प्रेत बाहेर काढण्याचा प्रयत्न केला़ मात्र, विहिरीत तब्बल ८० फूट पाणी असल्याने प्रेत त्यांच्या हाती लागले नाही़ त्यानंतर सातडेसात एचपीच्या पाच मोटारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास बसवून पाणीउपसा सुरू करण्यात आला़ रात्री १० वाजेपर्यंत म्हणजे १२ तास सतत मोटारी सुरू ठेवून ७६ फूट पाणीउपसा करण्यात आला़ त्यानंतर उमरगा अग्निशमन दलाचे दोन जवान, दाळींब येथील चाकुरे, येणेगूरचे मदार भालके, सिराज मुन्शी, उत्तम सगर आदीनी विहिरीत उतरून सहा फूटाच्या पाण्यात मृतदेहाचा शोध घेवून ते बाहेर काढले़ येणेगूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉ़ दिनकर जोशी यांनी मंगळवारी सकाळी शवविच्छेदन केले़ त्यानंतर काशिनाथ जगताप यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले़ दरम्यान, मृतदेहाचा शोध घेण्यासाठी मंडल अधिकारी प्रभाकर पाटील, पोहेकॉ गोरोबा कदम, कैलास चाफेकर, तलाठी प्रविण कोकणे, पोलिस पाटील शिवदर्शन पाटील, जाधव आदीनी परिश्रम घेतले़ कनिष्ठ अभियंता पी़एम़चव्हाण यांनी पाणी उपसा करण्यासाठी वीजपुरवठा सुरळीत ठेवून प्रशासनाला मोठी मदत केली. (वार्ताहर)

Web Title: Driver's body found after 12 hours of attempt