बीड बायपासवरील दत्त मंदिराची दान पेटी चोरट्यांनी पळवली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2019 13:00 IST2019-01-10T12:59:32+5:302019-01-10T13:00:50+5:30
चोरीचा हा प्रकार मंदिराच्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.

बीड बायपासवरील दत्त मंदिराची दान पेटी चोरट्यांनी पळवली
औरंगाबाद : बीड बायपासवरील दत्त मंदिराच्या दोन दानपेट्या चोरट्याने पळविल्याची घटना बुधवारी मध्यरात्री १.३० वाजेच्या सुमारास घडली. चोरीचा हा प्रकार मंदिराच्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून याचा पोलीस अधिक तपास करत आहेत.
शहरालगतच्या बीड बायपासवर देवळाई चौकात दत्त मंदिर आहे. बुधवारी मध्यरात्री १.३० वाजेच्या सुमारास एका चोरट्याने मंदिराच्या दोन्ही दान पेट्या पळवल्या. दानपेटीतील केवळ नोटा पळवून चोरट्याने एक दानपेटी मंदीर परिसरात तर दुसरी मंदिराच्या मागे टाकली.
घटनेची माहिती मिळताच सातारा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रेमसागर चंद्रमोरे, उप निरीक्षक डोईफोडे यांनी घटनास्थळी धाव घेतली. मंदिर परिसरात असलेल्या सीसीटीव्हीमध्ये चोरीचा हा संपूर्ण प्रकार कैद झाला असून पोलिसांनी अधिक तपासासाठी तो ताब्यात घेतला आहे.
पंधरा दिवसापूर्वी शहरातील संस्थान गणपती मंदिराची दानपेटीसुद्धा याच पद्धतीने पळविण्यात आली होती. पोलिसांनी या प्रकरणात चौवीस तासात कारवाई करत दोघांना अटक केली होती.