लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : समृद्धी महामार्गाला ‘डीएमआयसी’साठी शेंद्रा औद्योगिक वसाहतीतून कनेक्टीव्हिटी देण्याची तयारी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने दर्शवली आहे; परंतु गेल्या आठ महिन्यांपासून यासाठी होणाऱ्या सुमारे ४२ कोटी रुपयांच्या खर्चाला ‘एमआयडीसी’कडून होकार मिळालेला नाही. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात होणाऱ्या एमआयडीसी संचालक मंडळाच्या बैठकीत यावर निर्णय होईल का, याकडे येथील उद्योग जगताचे लक्ष लागले आहे.
एकीकडे ‘डीएमआयसी’मुळे औरंगाबाद शहर प्रकाशझोतात आले आहे. या पंचतारांकित औद्योगिक क्षेत्रात बहुराष्ट्रीय कंपन्यांना आकर्षित करायचे असेल, तर औरंगाबादेत आंतरराष्ट्रीय विमानसेवेची कनेक्टीव्हिटी मिळाली पाहिजे, पुण्यासाठी थेट रेल्वेसेवा सुरू झाली पाहिजे, अशी उद्योजकांची मागणी जोर धरु लागली आहे. तर दुसरीकडे औरंगाबादेतून जाणाऱ्या ‘सुपर एक्स्प्रेस वे’ अर्थात समृद्धी महामार्गाला शेंद्रा इंडस्ट्रीयल पार्कची कनेक्टीव्हिटी मिळेल, या अपेक्षेने उद्योग क्षेत्रात समाधानाचे वातावरण आहे. मात्र, या रस्त्याच्या कनेक्टीव्हिटीवर खर्च कोणी करायचा, हा मुद्दा मागील चार महिन्यांपासून लालफितीत अडकून पडला आहे.
समृद्धी महामार्गाच्या सध्याची कंत्राटदार संस्थेमार्फतच शेंद्रा इंडस्ट्रीयल पार्कपासून कनेक्टीव्हिटी देण्याचे काम केले जाणार आहे. त्यासाठी ‘एमएसआरडीसी’ने जोडरस्ता, अंडरपास जंक्शन व अन्य बाबींचा आराखडा व अंदाजित खर्चाचा प्रस्ताव एमआयडीसीकडे सादर केलेला आहे. त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही. दुसरीकडे, दिनांक १ मेपासून हा महामार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे. त्यामुळे ‘कनेक्टीव्हिटी’साठी अडचणी येतील का, असा प्रश्नही उपस्थित झाला आहे.
चौकट.....
वाहतुकीला अडथळा येणार नाही
यासंदर्भात महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे अधीक्षक अभियंता ए. बी. साळुंके यांनी सांगितले की, शेंद्रा इंडस्ट्रीयल पार्कसाठी कनेक्टीव्हिटी देण्यासाठी लागणारे सुमारे ४२ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक ‘एमआयडीसी’कडे सादर केले आहे. पुढील आठवड्यात होणाऱ्या एमआयडीसी संचालक मंडळाच्या बैठकीसमोर हा प्रस्ताव आहे. त्याला मान्यता मिळाल्यास तातडीने कनेक्टीव्हिटीचे काम सुरू केले जाईल. दरम्यान, १ मेपासून समृद्धी महामार्गावरुन सुरू होणाऱ्या वाहतुकीला या कामामुळे अडथळा येणार नाही. कनेक्टीव्हिटीचे काम पूर्ण झाल्यानंतरच शेंद्रा इंडस्ट्रीयल पार्कची वाहतूक या महामार्गावरुन सुरु केली जाणार आहे.