आता नव्या वर्षात छ. संभाजीनगराला दररोज पाणीपुरवठा; नवी पाणीपुरवठा योजना कार्यान्वित होणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2025 15:48 IST2025-10-31T15:47:07+5:302025-10-31T15:48:22+5:30
छत्रपती संभाजीनगर शहराला अतिरिक्त २०० एमएलडी पाणीपुरवठा; १५ डिसेंबरपासून जॅकवेल आणि जलशुद्धीकरणात टेस्टिंग

आता नव्या वर्षात छ. संभाजीनगराला दररोज पाणीपुरवठा; नवी पाणीपुरवठा योजना कार्यान्वित होणार
छत्रपती संभाजीनगर : नवीन वर्षात शहरवासीयांना अतिरिक्त २०० एमएलडी पाणी देण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने जोरदार तयारीला सुरुवात केली असून, १५ डिसेंबरपासून जायकवाडीहून पाण्याचा उपसा करणे आणि नक्षत्रवाडी येथील नवीन जलशुद्धीकरणात टेस्टिंग केली जाणार आहे. नियाेजित तारखेत दोन ते चार दिवस मागे पुढे हाेऊ शकतात. मात्र, कोणत्याही परिस्थितीत पाणी देण्यात येणार असल्याचे ‘मजीप्रा’च्या सूत्रांनी सांगितले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ३१ डिसेंबरपर्यंत शहराला अतिरिक्त पाणी देण्याची घोषणा केली आहे. अगोदर मजीप्राने न्यायालयात ऑक्टोबरअखेर पाणी देण्यात येईल, असे नमूद केले होते. मात्र, ऑक्टोबरअखेरपर्यंत अंतिम टप्प्यातील कामे संपली नाहीत. अतिवृष्टीमुळे मजीप्रा आणि कंत्राटदार कंपनीला अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. तीन आठवडे जायकवाडी आणि पैठण रोडवरील जलवाहिनीचे काम बंद ठेवावे लागले. त्यानंतर पहिल्या टप्प्यात जॅकवेलवर (पाणी उपसा केंद्र) अंतिम स्लॅब टाकण्यात आला. जॅकवेलमध्ये ४ हजार हॉर्सपॉवरची मोटार बसविण्यात आली. आता विद्युत मोटार आणि शेड उभारण्याचे काम शिल्लक आहे. काही ठिकाणी मुख्य जलवाहिनी जोडणीचे काम राहिलेले आहे. कौडगाव येथील काम थोडे मोठे आहे.
दीड महिनाच शिल्लक
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, डिसेंबरअखेरपर्यंत शहराला दोनशे एमएलडी पाणी देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. त्यादृष्टीने तयारी सुरू आहे. नोव्हेंबर महिनाच कामासाठी राहिलेला आहे. मुख्य जलवाहिनीची जोडणी पूर्ण केली जाईल, जॅकवेल येथील विद्युत पुरवठ्याची कामे पूर्ण केली जातील. उर्वरित किरकोळ कामे डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पूर्ण होतील. १५ डिसेंबरपासून दोनशे एमएलडी पाणी देण्यासाठी चाचणी सुरू केली जाईल. दीड महिनाच विविध कामांसाठी शिल्लक असल्याचे सूत्रांनी नमूद केले.