मध्यप्रदेशच्या मजुरांची क्रूरता; मंदिरातील चोरीस विरोध केल्याने महिला कीर्तनकाराची हत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2025 15:31 IST2025-07-02T15:29:57+5:302025-07-02T15:31:37+5:30
कीर्तनकार हत्याकांड उलगडले; मंदिरात कीर्तनकाराचा दगडाने ठेचून खून, आरोपींची कबुली हत्येचा उद्देश फक्त चोरी

मध्यप्रदेशच्या मजुरांची क्रूरता; मंदिरातील चोरीस विरोध केल्याने महिला कीर्तनकाराची हत्या
छत्रपती संभाजीनगर: कीर्तनकार सुनीता अण्णासाहेब पवार महाराज यांच्या निर्घृण हत्येचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे. या हत्येप्रकरणी मूळच्या मध्यप्रदेशातील दोन मजुरांना छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. संतोष उर्फ भायला चौहान आणि अनिल उर्फ हाबडा विलाला अशी आरोपींची नावे आहेत. चोरी करताना विरोध केल्याने कीर्तनकार पवार यांची हत्या केल्याची कबुली त्यांनी दिली.
२७ जून रोजी रात्री चोरट्यांनी मंदिराचे कुलूप तोडून दानपेटी, मूर्त्या व इतर साहित्य चोरी केल्यानंतर झोपलेल्या कीर्तनकार सुनीता पवार यांच्या डोक्यात दगड घालून त्यांचा खून केला होता. याप्रकरणी त्यांच्या भावाने दिलेल्या फिर्यादीवरून विरगाव पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. तपास करत असताना स्थानिक गुन्हे शाखेला १ जुलै रोजी गोपनीय माहिती मिळाली. महालगाव शिवारातील गणेश भेळ सेंटर परिसरात एक संशयित व्यक्ती फिरत असल्याचे समजल्यावर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याचे नाव संतोष उर्फ भायला चौहान (रा. अंछली, ता. सेंधवा, जि. बडवाणी, मध्यप्रदेश) असे असल्याचे निष्पन्न झाले. त्याने साथीदार अनिल उर्फ हाबडा विलाला याच्यासोबत मिळून मंदिरात चोरीसाठी आले असताना कीर्तनकार सुनीता पवार यांचा खून केल्याची कबुली दिली. अनिल हा घटनेनंतर गावी पळून गेला होता. त्याला शोधण्यासाठी पोलिसांनी मध्यप्रदेशमध्ये पाठवलेल्या पथकाने शिरपूर सीमेवरून त्याला अटक केली. चौकशीत त्यानेही गुन्ह्याची कबुली दिली.
ही कारवाई ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार मे. राठोड, अपर पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह, उपविभागीय पोलीस अधिकारी भागवत फुंदे, पोनि विजयसिंह राजपूत, सपोनि शंकर वाघमोडे व स्थानिक गुन्हे शाखा व पोलिस ठाणे विरगाव यांनी केली.
मजुरांच्या नजरेस पडले मंदिर अन् खून
मध्यप्रदेश येथून मजुरीसाठी आलेले संतोष चौहान आणि अनिल विलाला हे मंदिर परिसरात मागील वर्षभरापासून राहत होते. दोघांच्या नजरेत मंदिर आले. येथे भरपूर पैसे आणि दागिने मिळतील या उद्देशाने दोघांनी मंदिरात प्रवेश केला. कीर्तनकार सुनीता पवार यांना चोरांची चाहूल लागली. त्यांनी विरोध केल्याने त्यांचा दोघांनी खून केल्याचे स्पष्ट केले. दोन्ही आरोपींविरुद्ध भादंवि कलम १०३, ३०५, ३३१ (८), ३३१ (४) अंतर्गत गुन्हा दाखल असून, त्यांना पुढील तपासासाठी विरगाव पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले आहे.