गणित पेटी खरेदीप्रकरणी गुन्हा
By Admin | Updated: February 18, 2016 00:07 IST2016-02-18T00:03:21+5:302016-02-18T00:07:41+5:30
औरंगाबाद : जिल्हा परिषदेत बऱ्याच दिवसांपासून गाजत असलेल्या गणित पेटी खरेदी घोटाळाप्रकरणी अखेर बुधवारी क्रांतीचौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

गणित पेटी खरेदीप्रकरणी गुन्हा
औरंगाबाद : जिल्हा परिषदेत बऱ्याच दिवसांपासून गाजत असलेल्या गणित पेटी खरेदी घोटाळाप्रकरणी अखेर बुधवारी क्रांतीचौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. शिक्षण विभागातील सहायक कार्यक्रम अधिकाऱ्याने आपल्या अधिकारात नसताना मुख्याध्यापकांना पुरवठादार संस्थेचे आॅर्डर फॉर्म व दरपत्रक दिले तसेच पुरवठादार संस्थेला मुख्याध्यापकांचे पुरवठा आदेश एकत्रितरीत्या दिल्याचे चौकशीत उघड झाले. त्यावरून वित्तीय नियमांचा भंग केला म्हणून उपशिक्षणाधिकारी एन.के. देशमुख यांनी फिर्याद नोंदविली.
राजेंद्र मालुसरे (रा. जळगाव घाट, ता. कन्नड) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. विभागीय आयुक्तांनी पोलीस आयुक्तांना पत्र दिल्यानंतरही बऱ्याच दिवसांपासून गुन्हा दाखल होत नसल्यामुळे तक्रारदारांनी पुन्हा निवेदने दिली होती.
याबाबत क्रांतीचौक ठाण्याचे पोलीस निरीक्षक गोवर्धन कोळेकर यांनी सांगितले की, २०१०-११ मध्ये जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने ‘शाळा अनुदान’ योजनेंतर्गत एक कोटी ७८ लाख ७९ हजार रुपयांच्या गणित पेट्यांची खरेदी केली होती. त्यासाठीचा निधी गटशिक्षणाधिकाऱ्यांमार्फत शालेय व्यवस्थापन समित्यांकडे वर्ग करण्यात आला होता.
कमीत-कमी तीन संस्थांकडून दरपत्रके मागवून स्पर्धात्मक दराद्वारे कमी दर असणाऱ्या पुरवठादार संस्थेकडून साहित्य खरेदी करण्याचे बंधनकारक करण्यात आले होते.
या प्रकरणी प्रकाश कासारे पाटील यांनी खरेदीत गैरव्यवहार झाल्याची तक्रार मुख्य कार्यकारी अधिकारी आणि विभागीय आयुक्तांकडे केली होती.
विभागीय आयुक्तांनी शिक्षण उपसंचालकांना चौकशीचे आदेश दिले होते. शिक्षण उपसंचालकांनी पाच सदस्यीय समिती स्थापन करून चौकशी अहवाल विभागीय आयुक्तांकडे सादर केला.
त्यानुसार मालुसरे यांनी प्रशासनाची फसवणूक केली म्हणून क्रांतीचौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सहायक पोलीस निरीक्षक सुनीता मिसाळ या सुटीवर असल्याने तपास फौजदार एस.बी. अहिरे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. मिसाळ या रुजू झाल्यानंतर तपास त्यांच्याकडे सोपविण्यात येणार आहे.