कोर्ट मॅरेज झाले, चहापानासाठी थांबताच नवरी फरार; आणखी एका शेतकरी पुत्राची फसवणूक!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2025 13:37 IST2025-10-20T13:35:57+5:302025-10-20T13:37:33+5:30
नाशिक जिल्ह्यातील शेतकरी युवकाला फसवणारी टोळी उघडकीस

कोर्ट मॅरेज झाले, चहापानासाठी थांबताच नवरी फरार; आणखी एका शेतकरी पुत्राची फसवणूक!
छत्रपती संभाजीनगर : लग्नाळू युवकासोबत बनावट लग्न करून नवरीने रस्त्यातूनच पळून जाण्याचा प्रकार शहरात उघडकीस आला आहे. नाशिक जिल्ह्यातील एका शेतकऱ्याच्या मुलाचे लग्न एका महिलेच्या माध्यमातून मुलीच्या मावशीने जमवले. त्यासाठी रोख पैशांसह सोन्याचे दागिने असा एकूण ३ लाख ८६ हजार रुपयांचा ऐवज घेतला. न्यायालयातून सासरी निघालेल्या नवरीने रस्त्यातूनच महागड्या गाडीतून धूम ठोकल्याचा प्रकार २४ सप्टेंबर रोजी घडला आहे. या प्रकरणी सिडको पोलिस ठाण्यात तीन महिलांच्या विरोधात १८ ऑक्टोबर रोजी गुन्हा नोंदवल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक अतुल येरमे यांनी दिली.
ज्योती राजू गायकवाड (बोगस नाव ज्योती मिसाळ, रा. हर्षनगर, छत्रपती संभाजीनगर), माया मधुकर शिंदे आणि सविता मधुकर शिंदे (रा. दुसरबीड, ता. सिंदखेडराजा, जि. बुलढाणा) अशी आरोपी महिलांची नावे आहेत. नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील फिर्यादी शेतकरी पत्नी व दोन मुलांसह शेती करून उदरनिर्वाह करतात. त्यांचा मुलगा महेश (नाव बदलले) याच्या लग्नासाठी मुलगी पाहिली जात होती. तेव्हा शेतात कामासाठी येणाऱ्या एका महिलेने ओळखीतील मुलगी असल्याचे सांगितले. फोटो, बायोडेटा मागवल्यानंतर मुलगी पसंत असल्यामुळे पुढच्या बोलणीसाठी मुलीची मावशी म्हणून आरोपी ज्योती गायकवाड हिचा नंबर दिला. त्यानुसार फिर्यादीसह महेश आणि इतर कुटुंबीय २३ सप्टेंबरला सिडको एन -६ भागात ज्योतीच्या घरी आले. तिथे ज्योती, रेखा मिसाळ व नवरी मुलगी माया हजर होत्या. मुलीच्या वडिलांचे तीन वर्षांपूर्वी निधन झाले असून, आईवर रुग्णालयात उपचार सुरू असल्याची थाप मारली.
मुलगी व तिचे कुटुंब पाहिल्यानंतर फिर्यादींना मुलगी पसंत आली. तेव्हा आरोपींनी मुलीच्या आईच्या आजारपणाचा मुद्दा काढत तिच्या उपचारासाठी व दागिन्यांसाठी १.८० लाखांची मागणी केली. तसेच लग्न कोर्ट मॅरेजद्वारे करायचे ठरले. त्यासाठी आरोपींनी वकिलाला पाच हजार पाठवायला लावले. त्यानंतर १ लाख रोख, ३० हजार फोन पेद्वारे, ५० हजार मित्रामार्फत आणि १ लाख ७९ हजारांचे सोन्याचे दागिने असे एकूण ३ लाख ८६ हजारांचा व्यवहार केला. कपडे व भेटवस्तूंसाठी १० हजार खर्च केले. २४ सप्टेंबर रोजी सकाळी सर्व मंडळी जिल्हा न्यायालयासमोर कोर्ट मॅरेजसाठी जमली. तलवार नावाच्या वकिलाने मुला-मुलीची कागदपत्रे घेतली व फी म्हणून १२ हजार घेतले. त्यानंतर मुलीला सोबत घेऊन कुटुंबीय गावाकडे निघाले. शहराच्या बाहेर पडल्यानंतर हॉटेलवर कुटुंब चहा पिण्यासाठी खाली उतरले. त्याचक्षणी एक पांढऱ्या रंगाची विनाक्रमांक स्कॉर्पिओ गाडी आली आणि मुलगी माया शिंदे अचानक त्या गाडीत बसून पसार झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
बदनामीमुळे तक्रार थांबवली
घटना घडल्यानंतर बदनामीच्या भीतीने शेतकरी कुटुंबाने तक्रार दिली नाही. मात्र, काही दिवसांनी कोपरगाव (जि. अहिल्यानगर) येथे लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक करणारी टोळी पोलिसांनी पकडल्याचे समाेर आले. तेव्हा फिर्यादींनी नातेवाईकाला सोबत घेत कोपरगावला जाऊन शहानिशा केली. तेव्हा फिर्यादीला फसवणाऱ्याच महिला असल्याचे समोर आले. त्यानंतर फिर्यादीने छत्रपती संभाजीनगर गाठत सिडको पोलिस ठाण्यात पो. नि. अतुल येरमे यांच्याकडे तक्रार दिली. त्यानंतर गुन्हा नोंदविण्यात आला.