जमिनीच्या वादातून ५ हजारांची सुपारी; गंगापूरहून छत्रपती संभाजीनगरात येताच तरुणावर हल्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2025 12:25 IST2025-11-26T12:21:28+5:302025-11-26T12:25:23+5:30
न्यायालयीन कामासाठी आलेल्या तरुणावर जीवघेणा हल्ला; दोन हल्लेखोरांना गुन्हे शाखेकडून अटक, मुख्य सूत्रधाराचा शोध सुरू

जमिनीच्या वादातून ५ हजारांची सुपारी; गंगापूरहून छत्रपती संभाजीनगरात येताच तरुणावर हल्ला
छत्रपती संभाजीनगर : गंगापूरहून शहरात आलेल्या तरुणावर सोमवारी दुपारी अदालत रोडवर चाकूहल्ला करण्यात आला. हा प्रकार सुपारी देऊन झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. वीरेंद्र ऊर्फ गणेश राजेंद्र शिरसाठ (२३, रा. भीमनगर), हनी ऊर्फ हर्षद भूषण जावळे (१९, रा. ख्रिस्तनगर, शांतीपुरा) या हल्लेखोरांना गुन्हे शाखेने अटक केली.
गंगापूर तालुक्यातील मांगेगावचा असलेला गौरव संजय मावस (२३) व त्याचा मित्र विजय साळुंके सोमवारी न्यायालयीन कामकाजासाठी शहरात आले. भगवान महावीर चौकात उतरून ते सतीश मोटर्सच्या दिशेेने पायी निघाले. पगारिया बजाज शोरूमसमोर पायी जात असताना अचानक त्यांच्यावर हल्ला झाला. दोघांनी गौरवच्या पोट व छातीत चाकू खोलवर खुपसला. गौरव रक्तबंबाळ अवस्थेत रस्त्यावर बेशुद्ध पडला. त्याच्यावर घाटी रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
रात्रीतून आवळल्या मुसक्या
या हल्ल्यानंतर गुन्हे शाखेसह क्रांती चौक पोलिस आरोपींच्या शोधात होते. सीसीटीव्ही फुटेजवरून गुन्हे शाखेचे निरीक्षक गजानन कल्याणकर, सहायक निरीक्षक विनायक शेळके यांना वीरेंद्र व हनीची गुप्तपणे माहिती समजली. शेळके, अंमलदार मनोज अकोले, प्रदीप दंडवते व मंगेश शिंदे यांनी धाव घेत दोघांच्या मुसक्या आवळल्या. चौकशीत दोघांनी गुन्ह्याची कबुली दिली.
५ हजार रुपयांत हल्ल्याची सुपारी
हल्लेखोर वीरेंद्र शिरसाठवर अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याप्रकरणी छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून, तो बँड पथकात काम करतो. हनी रिक्षाचालक आहे. दोघांनी त्यांना अण्णा बोरगे नावाच्या व्यक्तीने या हल्ल्यासाठी ५ हजार रुपयांची सुपारी दिल्याचे सांगितले. बोरगे हा कुख्यात गुन्हेगार असून, त्याच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. हल्ल्यापूर्वी वीरेंद्र व हनीला दुरून गौरव दाखवण्यात आला होता.
जमिनीच्या वादाचा संशय
गौरवच्या मामाचे जमिनीबाबत न्यायालयात वाद सुरू आहेत. त्या प्रकरणातूनच हल्ला झाल्याचा प्राथमिक संशय पोलिसांनी व्यक्त केला. त्यांच्यावर हेडगेवार रुग्णालय परिसरात देखील हल्ल्याचा प्रयत्न झाल्याची माहिती त्यांनी पोलिसांना दिली.