संचिका मंजुरीसाठी आयुक्तांना गराडा
By Admin | Updated: September 4, 2014 00:56 IST2014-09-04T00:37:40+5:302014-09-04T00:56:02+5:30
औरंगाबाद : महापालिकेचे मावळते आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांना आज नगरसेवकांनी स्पील ओव्हरच्या संचिकांवर मंजुरी मिळण्यासाठी अक्षरश: घेराव घातला होता.

संचिका मंजुरीसाठी आयुक्तांना गराडा
औरंगाबाद : महापालिकेचे मावळते आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांना आज नगरसेवकांनी स्पील ओव्हरच्या संचिकांवर मंजुरी मिळण्यासाठी अक्षरश: घेराव घातला होता. खा.चंद्रकांत खैरे यांनी आजवर मिळेल तेथे आयुक्तांवर टीका केली. शिवसेना सदस्यांनी मात्र आयुक्तांच्या कार्यशैलीवर स्तुतिसुमने उधळली. विकासकामे, आर्थिक घडी बसविण्यासाठी आयुक्तांनी परिश्रम घेतल्याचे युती सदस्य म्हणाले.
आयुक्तांना आज स्थायी समितीच्या बैठकीत सभापती विजय वाघचौरे यांच्या अध्यक्षतेखाली निरोप देण्यात आला. यावेळी नगरसेविका सत्यभामा शिंदे, संजय चौधरी, फिरदौस फातेमा यांनी स्पील व इतर कामांच्या संचिकांना मंजुरी देण्याची मागणी आयुक्तांकडे केली. बैठक संपल्यानंतर आयुक्तांच्या दालनात अनेक नगरसेवकांनी तसेच प्रशासनातील अधिकाऱ्यांनी गर्दी केली होती. काल २ रोजी आयुक्तांच्या बंगल्यावर प्रलंबित संचिकांसाठी कंत्राटदार, बिल्डर, नगरसेवकांनी गर्दी केली होती. निलंबित अधिकाऱ्यांनाही आयुक्तांनी जाता-जाता पुन्हा कामावर घेतले आहे. नगररचना विभागाच्या अनेक संचिका आयुक्तांनी मंजूर केल्या. सदस्य त्र्यंबक तुपे, जगदीश सिद्ध, सुरेंद्र कुलकर्णी, मीर हिदायत अली, संजय चौधरी, फिरदौस फातेमा, सत्यभामा शिंदे, रवी कावडे, अनिल जैस्वाल, अनिल मकरिये यांनी याप्रसंगी मनोगत व्यक्त केले.
मी व्यक्तिगत समाधानी- डॉ.कांबळे
स्थायी समितीने केलेल्या सत्काराला उत्तर देताना मावळते आयुक्त डॉ.कांबळे म्हणाले, मनपात काम केल्यामुळे मी व्यक्तिगत समाधानी आहे. मी समांतरविरोधी असल्याचे आरोप झाले. हटवादी, जिद्दी, हेकेखोर असल्याचेही आरोप माझ्यावर झाले. मनपा ही संस्था महत्त्वाची समजून कायदेशीर काम केले. काही चुका झाल्या असतील. जाता-जाता अनेकांच्या संचिका पूर्ण केल्या आहेत. शिक्षण विभागात चांगले काम करता आले. १५०० कोटींची मनपाची कामे सुरू आहेत. मनपाचा दर्जा उंचावण्यात यश आले. उत्पन्नाचे नवीन स्रोत शासनाकडे कळविल्यामुळे पालिकेला क वर्गात प्रमोशन मिळाले. अॅप्रोच चॅनलसाठी साडेआठ कोटी, ५० कोटींचे रस्ते, भूमिगत गटार योजनेसाठी ४६५ कोटी, तीन वर्षांपासून रखडलेली ७९२ कोटींची समांतर जलवाहिनीची योजना, ११२ कोटींची पथदिव्यांची योजना मार्गी लावण्यासाठी काम केल्याचे ते म्हणाले.
महापौरांना गहिवरून आले
आयुक्तांनी जाण्यापूर्वी महापौर कला ओझा यांची भेट घेतली. महापौरांनी आयुक्तांचा सत्कार केला. १५०० कोटी रुपयांची कामे सुरू झाल्याबद्दल महापौरांनी आयुक्तांचे आभार मानले. यावेळी त्यांच्या भावना अनावर झाल्या होत्या.