जपानी स्वच्छतादूतांनी दिला स्वच्छतेचा संदेश

By Admin | Updated: August 26, 2014 01:52 IST2014-08-26T01:04:35+5:302014-08-26T01:52:00+5:30

औरंगाबाद : भारत-जपान मैत्री कार्यक्रमांतर्गत मागील तीन वर्षांपासून शहरात राबविण्यात येत असलेल्या महास्वच्छता अभियानाला आज गजानन महाराज मंदिर

Cleanliness message by Japanese hygiene workers | जपानी स्वच्छतादूतांनी दिला स्वच्छतेचा संदेश

जपानी स्वच्छतादूतांनी दिला स्वच्छतेचा संदेश



औरंगाबाद : भारत-जपान मैत्री कार्यक्रमांतर्गत मागील तीन वर्षांपासून शहरात राबविण्यात येत असलेल्या महास्वच्छता अभियानाला आज गजानन महाराज मंदिर परिसरातून सुरुवात झाली. जपानहून आलेल्या ७ स्वच्छतादूतांच्या उपस्थितीत सकाळी ७.३० वा. हे अभियान सुरू झाले. या अभियानातून जपानी स्वच्छतादूतांनी शहराला स्वच्छतेचा संदेश दिला. तीन वर्षांपासून जपानी दूत शहरात येऊन जनजागृतीसाठी येत आहेत. मात्र, यावर्षी मनपाकडून हे अभियान नावापुरतेच घेतल्यासारखे दिसले.
औरंगाबाद सिटी मेगा क्लिनिंग इव्हेंट आॅर्गनायझिंग कमिटीचे चैतन्य भंडारे आणि गिरीश मगरे यांच्या पुढाकाराने हे अभियान शहरात घेण्यात आले. एक तास शहरातील सर्व भागांमधील कचरा संकलन करून शहर स्वच्छ करण्याचा अभियानामागील मूळ उद्देश होता. महापौर कला ओझा यांच्या वॉर्डातच अभियानाची सुरुवात होती आणि त्यांचीच गैरहजेरी होती. त्यांना अचानक महापौर परिषदेसाठी डेहराडूनला जावे लागले. त्यामुळे त्या अभियानाला गैरहजर होत्या, असे मनपाकडून सांगण्यात आले.
जपानहून आलेले स्वच्छतादूत तोशिओ चिगुसा, जिनसुके सासाकी, ताकाफुमी एबिसो, अकितो साकाई, इत्सुकी स्वादा, मेगुमी सुरूगा, वाकाकाओ कुजिटा, चैतन्य भंडारे यांच्यासह सभापती विजय वाघचौरे, विरोधी पक्षनेते रावसाहेब गायकवाड, सभागृह नेते किशोर नागरे, नगरसेवक सुरेंद्र कुलकर्णी, सूर्यकांत जायभाये, आयुक्त डॉ.हर्षदीप कांबळे, उपायुक्त रवींद्र निकम, आरोग्य अधिकारी डॉ. संध्या टाकळीकर, स्वच्छता निरीक्षक ज्ञाते, खांदेवाले, मीना माळी, पी.जी.पंदारे, संतोष वाचासुंदर, मर्कड, शे.रज्जाक आदींनी अभियानात सहभाग नोंदविला.
१ तास शहरासाठी
शहरातील वेगवेगळ्या भागात १ तास कचरा संकलन केले जावे. त्यामध्ये शाळकरी विद्यार्थी, एनजीओ, सामाजिक सेवाभावी संस्था, लोकप्रतिनिधी, प्रशासकीय नागरिकांनी सहभागी व्हावे. असा संदेश मागील तीन वर्षांपासून जपानी दूत देत आहेत. पहिल्या वर्षी माजी महापौर अनिता घोडेले यांच्या कारकीर्दीत हे अभियान पहिल्यांदाच झाले. घोडेले यांनी जपान दौराही भारत-जपान मैत्री अंतर्गत केला. त्यानंतर दुसऱ्यावर्षी अभियानास प्रतिसाद मिळाला.
मनपाचा दावा असा
घनकचरा विभागप्रमुख डी.डी. सूर्यवंशी यांनी दावा केला की, २२०० कर्मचारी अभियानात सहभागी झाले होते. मनपा शाळेच्या १० हजार विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. ७ ते ८ हजार नागरिकही अभियानात सहभागी झाले होते. रोज ३५० मेट्रिक टन कचरा उचलला जातो. आज ५०० टन कचरा उचलला गेल्याचा दावा त्यांनी केला. गजानन महाराज मंदिर येथे ७ वा. अभियानाची वेळ ठेवण्यात आली होती. अभियान उशिरा सुरू झाले. तेथे अधिकारी, कर्मचारी, एनजीओचे मिळून २०० जणांनी अभियानात सहभाग घेतला. संत गाडगेबाबांच्या वेशात खंडूजी गायकवाड, चार्ली चॅपलिनच्या वेशात सोमनाथ सोभावणे यांनीही स्वच्छतेचा संदेश दिला.
शिवनेरी मित्रमंडळ, नगरसेवक प्रमोद राठोड यांचे स्वाभिमान मित्रमंडळाच्या शेकडो पदाधिकाऱ्यांनी अभियानात सहभाग नोंदविला. शिवनेरी मित्रमंडळाचे अ‍ॅड. शिंदे, आगलावे, खोतकर, विशाल अहिरराव, चौधरी आदी सदस्य अभियानात सहभागी होते.



मनपा व काही शाळांच्या विद्यार्थ्यांनीही अभियानात सहभाग नोंदविला.

Web Title: Cleanliness message by Japanese hygiene workers