मुख्यमंत्र्यांचा आदेश 'बेदखल'! कर्जवसुली स्थगित असताना आणखी ३५ शेतकऱ्यांना बॅंकेची नोटीस
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2025 15:17 IST2025-10-09T15:16:45+5:302025-10-09T15:17:46+5:30
उंडणगावच्या आणखी ३५ शेतकऱ्यांना बॅंकेची कर्जवसुलीसाठी नोटीस

मुख्यमंत्र्यांचा आदेश 'बेदखल'! कर्जवसुली स्थगित असताना आणखी ३५ शेतकऱ्यांना बॅंकेची नोटीस
उंडणगाव : सिल्लोड तालुक्यातील उंडणगाव परिसरात मागील महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी अडचणीत आले असताना बँक ऑफ बडोदाने कर्ज वसुलीची शेतकरी कन्हैया दगडू बसैये यांना नोटीस बजावल्याची बाब ‘लोकमत’ने बुधवारच्या अंकात चव्हाट्यावर आणली होती. त्यानंतर आणखी ३५ शेतकऱ्यांना याच बॅंकेने कर्जवसुलीची नोटीस बजावल्याची तक्रार संबंधित शेतकऱ्यांनी सदरील प्रतिनिधीकडे केली आहे.
अतिवृष्टीने खरीप पिकांचा चिखल झाल्याने शेतकरी पुरता कोलमडला असताना आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारीच कर्जवसुलीला स्थगिती दिली असल्याचे सांगितले असताना बॅंका मात्र मुख्यमंत्र्यांचा आदेश ऐकत नसल्याचे दिसून येत आहे. बुधवारच्या अंकात उंडणगाव येथील शेतकरी कन्हैया दगडू बसैये यांना बँक ऑफ बडोदाने तालुका विधी प्राधिकरणामार्फत थकीत कर्ज, त्यावरील व्याज व अन्य खर्च अशी रक्कम भरण्याची नोटीस दिल्याची व्यथा ‘लोकमत’ने बुधवारच्या अंकात मांडली होती. याची दखल घेऊन प्रशासन कारवाई करील अशी अपेक्षा होती; परंतु बॅंक प्रशासनाला याचे काहीही घेणे देणे दिसत नाही. गावातील आणखी ३५ शेतकऱ्यांना बॅंकेने कर्जवसुलीची नोटीस बजावल्याची बाब बुधवारी समोर आली. ‘लोकमत’चे वृत्त वाचून संबंधित शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा सदरील प्रतिनिधीकडे मांडल्या. तसेच बॅंकेच्या कारभाराबाबत संताप व्यक्त केला.
कर्जदारासह जामीनदारास आज न्यायालयात बोलावले
दरम्यान, ‘लोकमत’ने शेतकरी कन्हैयालाल बसैये यांची व्यथा बुधवारच्या अंकात मांडली होती. त्यानंतरही बँक ऑफ बडोदाने थकबाकी कर्जाच्या वसुलीसाठी बसैये यांच्यासह त्यांच्या कर्जास जामीन राहिलेले शेतकरी विनोद पंडित यांना सिल्लोड येथील न्यायालयाने गुरुवारी उपस्थित राहण्याची नोटीस बजावली आहे. त्यामुळे बसैये यांच्यासह पंडित यांचाही मानसिक ताण अधिकच वाढला आहे. याबाबत शेतकरी कन्हैयालाल बसैये म्हणाले, शेतीवर घेतलेले कर्ज फेडायचं आपण ठेवलं आहे. याबाबत स्वतः बँकेच्या शाखा व्यवस्थापक व कर्मचाऱ्यांना सांगितले आहे. तरीही माझे म्हणणे न ऐकता बँकेने मला कोर्टाची नोटीस बजावली आहे. यंदा उत्पन्नच नाही. तर कर्ज कसे भरू, असा प्रश्न माझ्यासमोर उभा आहे.