छ. संभाजीनगर पाणीपुरवठा योजनेचे दररोज दीड कि.मी.चे ‘टार्गेट’, होतेय केवळ १०० मीटरचे काम
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2025 15:39 IST2025-11-19T15:39:22+5:302025-11-19T15:39:59+5:30
उच्च न्यायालयाच्या कंत्राटदारास सूचना : मनुष्यबळ वाढवून कामे पूर्ण करा

छ. संभाजीनगर पाणीपुरवठा योजनेचे दररोज दीड कि.मी.चे ‘टार्गेट’, होतेय केवळ १०० मीटरचे काम
छत्रपती संभाजीनगर : शहराच्या पाणीपुरवठा योजनेतील पाणी वितरण व्यवस्थेचे दररोज किमान दीड कि.मी. काम होण्याचे ‘टार्गेट’ असताना केवळ १०० मीटरच काम होत आहे. कामासाठी दररोज किमान २५४ माणसे हवी असताना, केवळ ६५ माणसेच काम करीत आहेत. कंत्राटदाराने आश्वासीत केल्यानुसार अनेक ‘ईएसआर’ मनपाकडे हस्तांतरीत केले नाहीत. याबद्दल राज्य शासनाने मुख्य सरकारी वकील अमरजीतसिंह गिरासे यांच्यामार्फत तिव्र नापसंती व्यक्त करून कंत्राटदाराने मनुष्यबळ वाढवून वेळेत कामे पूर्ण करण्याची विनंती केली. यावरून योजनेतील महत्त्वाची कामे अद्यापही अपूर्णच असल्याचे मंगळवारच्या सुनावणीवेळी स्पष्ट झाले.
सुनावणीअंती न्या. रविंद्र घुगे आणि न्या. अश्वीन भोबे यांनी मनुष्यबळ वाढवून कामे पूर्ण करण्याच्या कंत्राटदारास सूचना केल्या. पुढील सुनावणी १२ डिसेंबरला होणार आहे.
‘ही’ महत्त्वाची कामे अद्यापही अपूर्णच
कंत्राटदाराने दाखल केलेल्या रोडमॅपनुसार ‘जॅकवेल’ चे काम ३१ ऑगस्ट २०२५ रोजी पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, अद्यापही ते अपूर्णच आहे. ‘ॲप्रोच ब्रीज’ चे काम ३ जून २०२५ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, अद्यापही ते अपूर्णच आहे. ‘ रॉ-वॉटर रायजींग मेन’ चे ३८ कि.मी. काम ३१ ऑगस्टपर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते. अद्यापही ०.१५८ कि.मी. चे काम अपूर्ण आहे. ९० पैकी ७५ ‘एअर वाॅल्व्ह’ आणि ६ पैकी ४ ‘एअर कुशन’ लावले आहेत. तर ३८ कि.मी. पैकी केवळ७ कि.मी. ची ‘हैड्रॉलिक टेस्ट’ झाली आहे. ‘प्युअर वॉटर रायजींग मेन’ची कामे अनेक ठिकाणी अपूर्णच आहेत. ‘मेजर बॅलन्सींग रिझर्व्हायर’ (एमबीआर) ची अनेक छोटी मोठी कामे बाकी आहेत. ‘वॉटर टाइटनेस टेस्ट’ झाली नाही.
शहर पाणी पुरवठ्याच्या ‘प्युअर वॉटर लीडिंग मेन’च्या ३८ कि.मी. पैकी ३७ कि.मी. काम पूर्ण झाले१.१४९ कि.मी. काम बाकी आहे. यापैकी केवळ ८ कि.मी. ची ‘हैड्रॉलिक टेस्ट’ झाली असून ३० कि.मी. ची टेस्ट बाकी आहे. ‘प्युअर वॉटर लिडींग मेन’ चे काम ३१ ऑक्टोबर २०२५ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते.याचे ३८ कि.पी.पैकी ४९ कि.मी. काम पूर्णझाले असून १३ कि.मी. चे काम बाकी आहे. शहराची १४२ कि.मी. ची पाणी वितरण व्यवस्था (जलवाहिन्या टाकणे) एक ऑक्टोबर २०२५ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होती. त्यापैकी केवळ २० कि.मी.काम झाले असून १२२ कि.मी.चे काम बाकी आहे. दुसऱ्या टप्प्यातील २६३ पैकी केवळ२४ कि.मी. जलवाहिन्या टाकल्या असून, २३९ कि.मी. काम बाकी आहे. हे काम ३१ डिसेंबरपर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते.