जायकवाडीचे पाणी छ. संभाजीनगरच्या उंबरठ्यावर, पण 'तीन दिवसाआड' पाणी मिळणार कधी?
By मुजीब देवणीकर | Updated: April 17, 2026 20:04 IST2026-04-17T20:03:57+5:302026-04-17T20:04:28+5:30
तहानलेल्या शहरवासियांसाठी आनंदाची बातमी, पण प्रतीक्षा कायम! जूनपासून शहराचा पाणीपुरवठा सुधारण्याची दाट शक्यता.

जायकवाडीचे पाणी छ. संभाजीनगरच्या उंबरठ्यावर, पण 'तीन दिवसाआड' पाणी मिळणार कधी?
छत्रपती संभाजीनगर : गतवर्षी ९०० मि.मी. व्यासाच्या जलवाहिनीमुळे शहराला वाढीव ७५ एमएलडी पाणी मिळेल. नागरिकांना दोन ते तीन दिवसाआड पाणी येणारच असे दिवास्वप्न दाखविण्यात आले. प्रत्यक्षात या जलवाहिनीतून १८ ते २० एमएलडी पाणी येत आहे. आता यंदाच्या उन्हाळ्यात २५०० मि.मी. व्यासाच्या नवीन जलवाहिनीद्वारे वाढीव २०० एमएलडी पाण्याचे स्वप्न दाखविले. १४ एप्रिलला जायकवाडीचे पाणी नक्षत्रवाडीपर्यंत आणले. जलशुद्धिकरण केंद्राची परीक्षा अजून बाकी आहे. या सर्व प्रक्रियेला किमान एक महिना तरी लागणार आहे. नागरिकांना जून महिन्यात वाढीव ५० एमएलडी पाणी नागरिकांना मिळण्याची दाट शक्यता आहे. तेव्हा शहराला तीन दिवसाआड पाणी मिळू शकते.
२७४० कोटी रुपये खर्च करून नवीन पाणीपुरवठा योजना राबविण्यात येत आहे. या योजनेचा सर्वांत मोठा टप्पा १४ एप्रिलला झाला. जायकवाडीहून नक्षत्रवाडी जलशुद्धिकरण केंद्रापर्यंत एका पंपद्वारे पाणी आणण्यात आले. आता जलशुद्धिकरण केंद्राची टेस्ट बाकी आहे. या टेस्टला किमान १ महिना लागू शकतो. जायकवाडीहून येणारे पाणी येथे शुद्ध होऊ लागल्यास ते पाणी जुन्या पाणीपुरवठा योजनेच्या एमबीआरमध्ये ५० एमएलडीपर्यंत घेता येऊ शकते. या वाढीव पाण्यामुळे नागरिकांना तीन दिवसाआड पाणी मिळू शकते.
नवीन योजनेची कामे अर्धवट
नवीन पाणीपुरवठा योजनेची कामे अर्धवट आहेत. शहरात तीन जलवाहिन्यांद्वारे पाणी आणले जाईल. त्यातील हर्सूल येथे जाणारी जलवाहिनी पूर्ण आहे. या जलवाहिनीला विविध जलकुंभापर्यंत कनेक्शन देण्यात आलेले नाहीत. जलकुंभातून नागरिकांना पाणी देण्यासाठीही कनेक्शन दिलेले नाही. या सर्व प्रक्रियेला बराच कालावधी लागू शकतो. केटली गार्डन, पहाडसिंगपुऱ्याकडे जाणाऱ्या जलवाहिनीचे काम अपूर्ण आहे.
१४० एमएलडी पाण्याची आवक
शहरात सध्या ७००, ९००, १२०० मिमी व्यासाच्या तीन जलवाहिन्यांमधून १४० एमएलडीपर्यंत पाणी येत आहे. येणाऱ्या पाण्याचे योग्य वितरण होत नाही. त्यामुळे नागरिकांना आठ ते दहा दिवसांनंतर पाणी मिळत आहे. नवीन योजनेतून आणखी ५० एमएलडी वाढीव पाणी सिडको-हडको, जुन्या शहराला मिळाल्यास नागरिकांना तीन दिवसाआड पाणी मिळू शकते.
पाणी देण्याचे नियोजन केले
नवीन योजनेतील कामे पूर्ण होण्यास विलंब होत असल्याने अगोदरच नक्षत्रवाडी येथील जुन्या एमबीआरला काही प्रमाणात पाणी देण्याची तरतूद महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने (मजीप्रा) केली आहे. जलशुद्धिकरण केंद्राची टेस्ट, क्लोरिन मिक्सिंग लायसन्स मिळताच वाढीव ५० एमएलडी पाणी मनपाच्या जुन्या योजनेला देण्यात येईल.
- मनीषा पलांडे, मुख्य अभियंता, मजीप्रा