छ. संभाजीनगर हादरले! जमीन हडपण्याच्या प्रयत्नात व्यापाऱ्याची हत्या, वडील-मुलगा गंभीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2025 13:27 IST2025-08-23T13:27:18+5:302025-08-23T13:27:54+5:30

सिडको एन-६ मधील संभाजी कॉलनीत मानवतेला काळिमा फासणारी घटना; राजकीय पदाधिकारी, माजी नगरसेवकांसमोर घडली हत्या

Chhatrapati Sambhajinagar shaken! Businessman killed in attempt to grab land, father-son critical | छ. संभाजीनगर हादरले! जमीन हडपण्याच्या प्रयत्नात व्यापाऱ्याची हत्या, वडील-मुलगा गंभीर

छ. संभाजीनगर हादरले! जमीन हडपण्याच्या प्रयत्नात व्यापाऱ्याची हत्या, वडील-मुलगा गंभीर

छत्रपती संभाजीनगर : घरासमोरील सिडकोच्या अतिरिक्त जागेवर कब्जा मिळविण्यासाठी राजकीय पाठबळ असलेल्या गुंड प्रवृत्तीच्या कुटुंबाने निष्पाप व्यापाऱ्याच्या कुटुंबावर लाठ्या काठ्या, धारदार चाकूने प्राणघातक हल्ला चढवला. यात प्रमोद रमेश पाडसवान (वय ३८) या तरुणाचा रुग्णालयात नेईपर्यंत मृत्यू झाला, तर त्यांचे वडील रमेश पाडसवान (६०) व मुलगा रुद्राक्ष (१७) हे गंभीर जखमी झाले. शुक्रवारी दुपारी १ वाजता एन-६ च्या संभाजी कॉलनीत ही धक्कादायक घटना घडली.

सौरभ काशिनाथ निमोने, ज्ञानेश्वर काशिनाथ निमोने, गौरव काशिनाथ निमोने, वडील काशिनाथ निमोने, आई शशिकला व जावई मनोज दानवे अशी हल्लेखोरांची नावे आहेत. २५ वर्षांपासून संभाजी कॉलनीत वास्तव्यास असलेल्या पाडसवान कुटुंबाचे संताजी किराणा नावाने दुकान आहे. ज्ञानेश्वरने ३ वर्षांपासून पाडसवान यांच्या घरासमोरील सिडकोच्या अतिरिक्त जागेवर (ऑडशेप प्लॉट) गणपती बसवणे सुरू केले. २ वर्षांपूर्वी पाडसवान कुटुंबाने दुकानासाठी हा प्लॉट रीतसर विकत घेतला. मात्र, निमोनेला हे खुपत होते. त्यातून ते पाडसवान यांच्याशी सातत्याने वाद घालून शिवीगाळ, मारहाण करत होते.

पाडसवान जागा देण्यासही तयार, पण.....
२ वर्षांपासून सुरू असलेला दोघांमधील वाद यंदाच्या गणेशोत्सवापूर्वी पुन्हा उफाळून आले. काही महिन्यांपूर्वीच बांधकामाचे नियोजन केल्याने पाडसवान यांनी या जागेवर साहित्य आणून ठेवले होते. निमोनेने मात्र संपूर्ण प्लॉटवरच मंडळाचे स्टेज लावण्यासाठी हट्ट केला. दोन दिवसांपासून ते पाडसवान कुटुंबाला साहित्य काढण्यासाठी धमकावत होते. पाडसवान यांनी शुक्रवारी जेसीबीद्वारे साहित्य बाजूला करत गणेशोत्सवासाठी अर्धा प्लॉट देण्याची तयारी दर्शवली होती. मात्र, निमोनेला ते मान्य नव्हते. त्याने संपूर्ण प्लॉटच रिकामा करण्यासाठी दबाव टाकणे सुरू केले.

स्तंभपूजनाचे निमित्त, थेट हत्येपर्यंत पोहोचले गुंड
-शुक्रवारी निमोनेने स्तंभपूजनाचे आयोजन केले. मोठाले बॅनर लावले. राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना आमंत्रित केले. सकाळी ११ वाजता वादाची पहिली ठिणगी पडली. स्थानिकांनी मध्यस्थी करत वाद मिटवले.
-दुपारी १ वाजता स्तंभपूजनाची तयारी सुरू असतानाच तिन्ही भावांसह त्यांचे वडील, आई, जावयाने पुन्हा पाडसवान कुटुंबासोबत वाद घातले. राजकीय पदाधिकारी, माजी नगरसेवकांसमोर लाठ्या-काठ्या, दगडांनी प्रमोद पाडसवान, त्यांचे वडील, आई, अल्पवयीन मुलावर राक्षसी हल्ला चढवला. घरातून चाकू आणत थेट सर्वांवर सपासप वार करत सुटले.

मुलाचा रस्त्यातच मृत्यू, नातू, आजोबा, आज्जी गंभीर
निमोने कुटुंबाच्या हल्ल्यात संपूर्ण पाडसवान कुटुंब गंभीर जखमी झाले. त्यांना एमजीएम रुग्णालयात दाखल केले. मात्र, पाठीतून पोटापर्यंत खोलवर वार झाल्याने प्रमोद यांचा रस्त्यातच मृत्यू झाला, तर आजोबा, नातवाला वाचवण्यासाठी रात्री उशिरापर्यंत डॉक्टरांचे शर्थीचे प्रयत्न सुरू होते.

Web Title: Chhatrapati Sambhajinagar shaken! Businessman killed in attempt to grab land, father-son critical

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.