विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2025 18:53 IST2025-08-24T18:52:37+5:302025-08-24T18:53:54+5:30
या परिसरात पर्यटकांना बंदी घालण्याची मागणी सातत्याने होत आहे.

विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू
खुलताबाद: छत्रपती संभागीनगरमधील जगप्रसिद्ध वेरुळ लेणीच्या डोंगरावर असलेल्या जोगेश्वरी कुंडात आज(दि.२४) रविवारी दुपारी पर्यटनासाठी आलेल्या दोघांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली.
याबाबत अधिक माहिती अशी की, आज सकाळी छत्रपती संभाजीनगरमधील विटखेडा परिसरातील एका खाजगी कोंचिंग क्लासेसची सहल वेरुळ लेणी परिसरात आली होती. विद्यार्थी आणि शिक्षक वेरुळ लेणी पाहून झाल्यानंतर १७ नंबर लेणी परिसरातून जोगेश्वरी कुंडाकडे गेले. यावेळी चेतन संजय पगडे (वय १७) याचा पाय घसरल्याने तो जोगेश्वरी कुंडात बुडू लागला. यावेळी त्याच्या सोबत असलेले शिक्षक राजवर्धन अशोक वानखेडे(वय ३०, रा. किन्होळा ता. चिखली जि. बुलढाणा) यांनी मागचा पुढचा विचार न करता कुंडात उडी मारली.
मात्र चेतन पगडे याने राजवर्धन वानखेडे यांना घट्ट पकडल्याने दोघेही बुडाले. इतर विद्यार्थी आणि शिक्षकांनी आरडाओरडा केल्यामुळे परिसरातील काही गुराख्यांनी येवून दोघांना बाहेर काढले, मात्र तोपर्यंत दोघांचा मृत्यू झाला होता. याबाबत माहिती मिळताच वेरुळ लेणीचे सुरक्षा रक्षक घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी रुग्णवाहिकेने मृतदेह खुलताबाद ग्रामीण रुग्णालय व त्यानंतर वेरुळ प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. पोहेकॉ राकेश आव्हाड आणि प्रमोद साळवी यांनी घटनेचा पंचनामा केला.
हे जोगेश्वरी कुंड अतिशय धोकादायक असून, पावसाळ्यात या ठिकाणी पर्यटकांची मोठी गर्दी असते. गेल्या महिन्यातही याच ठिकाणी बूडून एका युवकाचा मृत्यू झाला होता. या घटनांमुळे जोगेश्वरी कुंड परिसरात जाण्यास पर्यटकांना बंदी घालून, परिसरस तारकंपाऊड टाकण्याची मागणी सातत्याने होत आहे.