छत्रपती संभाजीनगर मनपाने नियोजन करून ४ ते ५ दिवसांआड पाणीपुरवठा करावा: हायकोर्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2025 16:51 IST2025-08-23T16:50:38+5:302025-08-23T16:51:25+5:30
२६ एमएलडी वाढीव पाणीपुरवठ्याचे आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्धाटन

छत्रपती संभाजीनगर मनपाने नियोजन करून ४ ते ५ दिवसांआड पाणीपुरवठा करावा: हायकोर्ट
छत्रपती संभाजीनगर : फारोळा येथील जलशुद्धीकरण केंद्राचे काम पूर्ण झाले आहे. आता ९०० मिमी जलवाहिनीद्वारे शहराला २६ एमएलडी अधिक पाणीपुरवठा होणार आहे. त्याचे उद्धाटन शनिवार, दि. २३ ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार असल्याचे निवेदन शुक्रवारी नवीन पाणीपुरवठा योजनेच्या जनहित याचिकेच्या सुनावणीवेळी एमजेपीतर्फे मुंबई उच्च न्यायालयात करण्यात आले.
त्यावर महापालिकेने वाढीव पाणीपुरवठ्याचे योग्य नियोजन करून, सध्या शहराला ८ ते ११ दिवसांनंतर होणाऱ्या पाणीपुरवठ्याऐवजी ४ ते ५ दिवसआड पाणीपुरवठा करण्याचा प्रयत्न करावा, अशी अपेक्षा न्या. रवींद्र घुगे आणि न्या. गौतम अनखड यांच्या द्विसदस्यीय खंडपीठाने व्यक्त केली. जायकवाडी येथील ‘जॅकवेल’च्या ए-विंग येथे पंप बसवण्याचे काम सुरू आहे. ते ५ सप्टेंबरपर्यंत पूर्ण होईल. त्यानंतर ३१ ऑक्टोबर २०२५ पर्यंत तेथून २५०० मिमी व्यासाच्या नवीन जलवाहिनीद्वारे शहराला पाणीपुरवठा सुरू होईल, असे एमजेपीच्या मुख्य अभियंता मनीषा पलांडे यांनी सुनावणीदरम्यान सांगितले.
मुख्य सरकारी वकील अमरजीतसिंह गिरासे यांनी उच्च न्यायालयातर्फे नियुक्ती समितीच्या १२ ऑगस्ट २०२५ रोजीच्या बैठकीचे इतिवृत्त सादर केले. ज्यात योजनेचे काम वेळेत पूर्ण होण्यासाठी मनुष्यबळ वाढविणे, जॅकवेलच्या ‘बी’ आणि ‘सी’ विंगचे काम पूर्ण करणे, नवीन जलशुद्धीकरण केंद्राचे काम पूर्ण करावे, आदी योजनेच्या विविध कामांबाबत समितीने दिलेल्या सूचनांचा समावेश आहे. या जनहित याचिकेवर १२ सप्टेंबर २०२५ रोजी पुढील सुनावणी होणार आहे.
आजच्या सुनावणीवेळी कंत्राटदारातर्फे ज्येष्ठ विधिज्ञ आर. एन. धोर्डे आणि ॲड. संकेत सूर्यवंशी, एमजेपीतर्फे ज्येष्ठ विधिज्ञ राजेंद्र देशमुख मुंबई उच्च न्यायालयातून प्रत्यक्ष तर मुख्य सरकारी वकील अमरजीतसिंह गिरासे, एमजेपीतर्फे ॲड. विनोद पाटील, ॲड. देशमुख आणि मूळ याचिकाकर्ता ॲड. मुखेडकर ‘व्ही.सी.’द्वारे औरंगाबाद खंडपीठातून सुनावणीत सहभागी झाले.