छ. संभाजीनगरात आयसीयूमध्ये एसीचा भडका अन् रुग्णांची पळापळ; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला थरारक अनुभव
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2026 14:30 IST2026-03-30T14:29:45+5:302026-03-30T14:30:53+5:30
सायरन वाजताच काही क्षणांत सर्वत्र धूर, गजानन महाराजांच्या कृपेने आम्ही वाचलो

छ. संभाजीनगरात आयसीयूमध्ये एसीचा भडका अन् रुग्णांची पळापळ; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला थरारक अनुभव
छत्रपती संभाजीनगर : जेवण करण्यासाठी डबा उघडला, तोच सायरन वाजला. आग लागली, बाहेर पडा, असे रुग्णालयातील कर्मचारी जोरजोराने ओरडू लागले. काही क्षणांत धूर पसरला. जेवणाचा डबा तसाच सोडून उपचारासाठी दाखल पतीला घेऊन तिसऱ्या मजल्यावरून कसेबसे रुग्णालयाबाहेर पडले. गजानन महाराजांच्या कृपेनेच आम्ही वाचलो, अशी भावना व्यक्त करीत सुमनबाई चाटूपळे यांनी गजानन हाॅस्पिटलमधील थरारक अनुभव ‘लोकमत’शी बोलताना उलगडला.
सुमनबाई चाटूपळे यांचे पती पंडित बापूराव चाटूपळे (रा. पैठण) यांचे चार दिवसांपूर्वी या हाॅस्पिटलमध्ये काखेतील गाठीवर शस्त्रक्रिया झाली. त्यांच्यावर तिसऱ्या मजल्यावरील वाॅर्डात उपचार सुरू होते. अचानक सायरन वाजला. लगेच रुग्णालयात आग लागल्याचे कळले. जेवणाला बसण्याआधीच हाताची सलाईन काढण्यात आलेली होती. त्यामुळे आगीची घटना घडल्यानंतर वेळीच बाहेर पडता आले, असे पंडित चाटूपळे यांनी सांगितले. चाटूपळे यांच्यासह दहारुग्णांना उपचारासाठी जालना रोडवरील वैद्यनाथ हाॅस्पिटलमध्ये दाखल केले. येथे डाॅ. संदीप सानप यांच्या देखरेखीत उपचार सुरू आहेत.
वडील ‘आयसीयू’त, ‘एसी’जवळ आग, लगेच भडका
माझे वडील फरीद चांद पटेल (रा. नांदगाव, नाशिक) यांच्यावर चार दिवसांपासून दुसऱ्या मजल्यावरील आयसीयूत उपचार सुरू होते. आयसीयूत असताना अचानक एसीजवळ आग लागली. काही वेळातच भडका उडाला आणि आग अधिक पसरली. अवघ्या १५ मिनिटांत वडिलांना रुग्णवाहिकेने दुसऱ्या रुग्णालयात हलविण्यात आले.
- साहिल फरीद पटेल, रुग्णाचा मुलगा
कसेबसे खाली उतरलो
दम्याच्या त्रासामुळे पती कांतीलाल दायमा (नांदगाव, नाशिक) यांना घेऊन आजच गजानन हाॅस्पिटलमध्ये दाखल झालो होतो. त्यांना दम्याचा त्रास आहे. आगीची घटना घडल्यानंतर आम्ही कसेबसे खाली उतरलो आणि दुसऱ्या रुग्णालयात आलो.
- लताबाई दायमा, रुग्णाची पत्नी
खिडकीतून धूर
रात्री ७:४५ ला रुग्णालयाच्या खिडकीतून धूर आला. तेव्हा ‘एसी’जवळून आग सुरू झाल्याचे समजले. काही वेळातच रुग्णांना रुग्णवाहिकेतून अन्यत्र हलविले. खिडकीतून खूप धूर येत होता.
- अरुण चव्हाण, प्रत्यक्षदर्शी
त्रुटी असणाऱ्यांना नाेटीस
गजानन हाॅस्पिटलमधील १० रुग्ण अन्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. या रुग्णालयाकडे फायर एनओसी, यंत्रणा आहे. आगीच्या घटना घडू नये, या दृष्टीने रुग्णालयांची आधीच तपासणी सुरू केली आहे. त्रुटी आढळलेल्या दोन ते तीन रुग्णालयांना नोटीस बजावल्या आहेत.
- डाॅ. पारस मंडलेचा, आरोग्य वैद्यकीय अधिकारी
१० दिवसांपूर्वीच ‘लोकमत’ने वेधले होते लक्ष
ओडिशातील कटक येथील ट्रॉमा आयसीयूमध्ये लागलेल्या आगीत दहा रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेनंतर ‘लोकमत’ने १९ मार्चला ‘जेव्हा रुग्णालयात लागते आग, तेव्हाच सरकारी यंत्रणेला जाग’ या मथळ्याखाली सविस्तर वृत्त प्रकाशित करीत रुग्णालयांच्या स्थितीकडे लक्ष वेधले होते. अनेक रुग्णालयांनी अग्निरोधक यंत्रणा सुस्थितीत असल्याची कागदपत्रे यंत्रणेला सादर केलेली नसल्याचे चिंता व्यक्त होत आहे. त्यातून अशा घटनांची पुनरावृत्ती नाकारता येत नाही.