व्यावसायिकांनो सावध व्हा! कर चुकवेगिरीवर ‘एआय’ची नजर; प्रत्येक व्यवहाराचे 'डेटा ॲनालिसिस'
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2025 18:03 IST2025-07-29T17:56:51+5:302025-07-29T18:03:44+5:30
जीएसटी व आयकर विभाग तंत्रज्ञानाच्या मदतीने जमवित आहेत उलाढालीची माहिती

व्यावसायिकांनो सावध व्हा! कर चुकवेगिरीवर ‘एआय’ची नजर; प्रत्येक व्यवहाराचे 'डेटा ॲनालिसिस'
- प्रशांत तेलवाडकर
छत्रपती संभाजीनगर : काही व्यावसायिक मोठ्या उलाढाली करूनहीजीएसटी व आयकर न भरता सरकारपासून आपली कमाई लपवण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, आता तंत्रज्ञानाच्या मदतीने शासनाने डिजिटल व्यवहारांवर नजर ठेवण्यास सुरुवात केली आहे. यूपीआय, क्यूआर कोड, कार्ड पेमेंटमधून मिळणाऱ्या डेटा ॲनालिसिसच्या आधारे आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) प्रणाली करचुकवेगिरी उजेडात आणत आहे आणि त्याद्वारे कारवाई केली जात आहे.
डेटा ॲनालिसिसच्या आधारे शोधले ७१ बोगस करदाते
राज्य जीएसटी विभागाच्या छत्रपती संभाजीनगर सहआयुक्तालयाने २०२४-२५ या आर्थिक वर्षात एआयने दिलेल्या डेटा ॲनालिसिसद्वारे ७१ बोगस करदात्यांना शोधण्यात यश आले तसेच नुकतीच देशातील १५० ठिकाणी आयकर विभागाने छापेमारी केली, ज्यात एआयनेही महत्त्वाची भूमिका बजावली.
४० लाखांवर उलाढाल असल्यास जीएसटी नोंदणी करा
व्यवसाय छोटा वा मध्यम असो, वस्तू विक्रीत वार्षिक उलाढाल ४० लाखांपेक्षा जास्त असेल तर जीएसटीमध्ये नोंदणी करावी लागेल तसेच सेवा उद्योगात वार्षिक उलाढाल २० लाखांपेक्षा जास्त असल्यासही जीएसटी नोंदणी करणे आवश्यक आहे.
यूपीआय व्यवहारांवर नजर
कोरोनानंतर मोठ्या प्रमाणावर ऑनलाइन ऑर्डर, घरपोच सेवा आणि ऑनलाइन पेमेंट्स होत आहेत. प्रति १०० पैकी ६० टक्के व्यवहार यूपीआयच्या माध्यमातून होत आहेत. त्यामुळे प्रत्येक व्यवहाराची नोंद डिजिटल स्वरूपात होऊ लागली आहे. त्यामुळे आता अगदी छोटे दुकान असो वा मोठा उद्योग, सर्व व्यवहारांचा डेटा सरकारच्या नजरेत येतो आहे. करचुकवेगिरी करण्याचा प्रयत्न ‘स्मार्ट’ यंत्रणांपुढे निष्फळ ठरत आहे. त्यामुळे व्यावसायिकांनी पारदर्शक व्यवहाराकडे वळण्याची हीच वेळ आहे, अन्यथा कायदेशीर कारवाई अटळ आहे.
जीएसटी नोंदणी करा
करचुकवेगिरी करण्याचा प्रयत्न ‘स्मार्ट’ यंत्रणांपुढे निष्फळ ठरत आहे. त्यामुळे व्यावसायिकांनी पारदर्शक व्यवहाराकडे वळण्याची हीच वेळ आहे. तुम्ही जीएसटी करदात्यांच्या नियमांत आल्यास स्वतःहून नोंदणी करा.
- अभिजीत राऊत, सहआयुक्त, राज्य जीएसटी, छत्रपती संभाजीनगर
जिल्ह्यातील जीएसटी करदात्यांची संख्या
- एकूण जीएसटी करदाते : २६,७९०
- मोठ्या व्यवसायातील करदाते : ७७२
- मध्यम व्यवसायातील करदाते : ३,३८०
- लघु व्यवसायातील करदाते : २२,६३८