बूम इन ऑरिक सिटी! गोदावरी न्यू एनर्जी, जपानच्या सँगो इंडियाची ४ हजार ७५२ कोटींची गुंतवणूक
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2025 16:44 IST2025-10-04T16:43:44+5:302025-10-04T16:44:32+5:30
ऑरिक सिटीच्या शेंद्रा आणि बिडकीन औद्योगिक पट्ट्यात आजपर्यंत तब्बल ९० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली असल्याची माहिती ऑरिककडून मिळाली.

बूम इन ऑरिक सिटी! गोदावरी न्यू एनर्जी, जपानच्या सँगो इंडियाची ४ हजार ७५२ कोटींची गुंतवणूक
छत्रपती संभाजीनगर : दिल्ली, मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉरअंतर्गत ऑरिक सिटीच्या बिडकीन औद्योगिक पट्ट्यात गोदावरी न्यू एनर्जी प्रा.लि.ने ४ हजार ४००कोटी रुपयांची, तर जपानची सँगो इंडिया कंपनी ३५२ कोटींची गुंतवणूक करणार आहे. या दोन्ही कंपन्यांमुळे २ हजार ३०० जणांना थेट रोजगार उपलब्ध होणार आहे. या दोन्ही कंपन्यांना गुरुवारी भूखंड वाटप करण्यात आले.
छत्रपती संभाजीनगरमध्ये ऑरिक सिटीमध्ये गतवर्षी टोयोटा- किर्लोस्कर, जेएसडब्ल्यू, एथर एनर्जी, लुब्रिझोल इंडिया आणि पिरॅमल फार्मा या मोठ्या कंपन्यांनी कोट्यवधींच्या गुंतवणुकीची घोषणा केली. तेव्हापासून येथील औद्योगिक विश्वात बूम आले आहे. ऑरिकमधील ९५ टक्के भूखंड वाटप झाले आहे. मोठ्या ईव्ही कंपन्यांच्या पुरवठादारांनीही येथे ऑरिकमध्ये भूखंड घेतले आहेत. आता आणखी दोन कंपन्यांनी बिडकीन डीएमआयसीमध्ये गुंतवणुकीचा निर्णय घेतला.
गोदावरी न्यू एनर्जी इंडिया प्रा. लि. कंपनी येथे ४ हजार ४०० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. ही कंपनी येथे इलेक्ट्रिक बॅटरी कंटेनर, लिथियम आयर्न सेलचे उत्पादन करणार आहे. यासाठी कंपनीने ऑरिककडे जागेची मागणी केली होती. त्यानुसार गुरुवारी गोदावरी कंपनीला ११४ एकर जमीन वाटप करण्यात आली आहे.
तर जपानच्या सँगो इंडिया ॲटोमोटिव्ह प्रा.लि. ही कंपनी येथे ३५२कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. ही कंपनी येथे ऑटोमेटिव्ह पार्ट तयार करणार आहे. कंपनीच्या मागणीनुसार ऑरिक प्रशासनाने कंपनीला २०एकर जमीन वाटप केली आहे. सँगो इंडिया येथे थेट १९५ जणांना रोजगार देणार असल्याची माहिती ऑरिकचे व्यवस्थापक महेश शिंदे यांनी दिली.
आजपर्यंत ९० हजार कोटींची गुंतवणूक
ऑरिक सिटीच्या शेंद्रा आणि बिडकीन औद्योगिक पट्ट्यात आजपर्यंत तब्बल ९० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली असल्याची माहिती ऑरिककडून मिळाली. यातील बहुतेक कंपन्या पुढील दोन वर्षांत उत्पादन सुरू करणार आहेत. आतापर्यंत गुंतवणूक करणाऱ्या कंपन्यांमुळे ५४ हजार जणांना थेट रोजगार उपलब्ध होणार आहे.
ईव्ही हबच्या दिशेने वाटचाल
छत्रपती संभाजीनगरच्या वाळूजची औद्योगिक वसाहत ऑटोमोटिव्ह इंडस्ट्री म्हणून ओळखली जाते. तशी आता ऑरिकच्या बिडकीन औद्योगिक पट्ट्यात इलेक्ट्रिक वाहन उत्पादन कंपन्यांनीच सर्वाधिक गुंतवणूक केली आहे. आता आणखी दोन कंपन्यांही ईव्ही संबंधित आहे. शिवाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही छत्रपती संभाजीनगर ईव्ही हब असेल, असे सांगितले होते. त्यानुसारच या शहराची ईव्ही हबच्या दिशेने वाटचाल सुरू आहे.
- मिहिर सौंदलगेकर, सचिव सीएमआयए