मोठी बातमी! ऑरिक बिडकीनला ९०० मि.मी. व्यासाच्या स्वतंत्र जलवाहिनीद्वारे होणार पाणीपुरवठा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2025 19:13 IST2025-10-03T19:13:26+5:302025-10-03T19:13:42+5:30
शेंद्रा आणि बिडकीन औद्योगिक पट्ट्यातील कंपन्यांना लागणाऱ्या एकूण पाण्यापैकी ४२ टक्के पाणी हे सांडपाणी प्रक्रिया करून वापरण्यात येणार आहे.

मोठी बातमी! ऑरिक बिडकीनला ९०० मि.मी. व्यासाच्या स्वतंत्र जलवाहिनीद्वारे होणार पाणीपुरवठा
छत्रपती संभाजीनगर : दिल्ली- मुंबई इंडस्ट्रिअल कॉरिडॉअर (डीएमआयसी)चा एक टप्पा असलेल्या ऑरिक या स्मार्ट इंडस्ट्रिअल सिटीच्या शेंद्रा व बिडकीन औद्योगिक पट्ट्यातील ९० टक्के भूखंड विविध कंपन्यांना वाटप केले आहेत. बिडकीन औद्योगिक क्षेत्राला ७२ एमएलडी पाणी जायकवाडीत राखीव केले आहे. ऑरिकने जायकवाडी प्रकल्प ते बिडकीनपर्यंत ९०० मि.मी. व्यासाची स्वतंत्र जलवाहिनी टाकण्याचे काम हाती घेतले. ऑरिक सिटीतील औद्योगिक, निवासी आणि कमर्शिअल आस्थापना पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होईल तेव्हाची गरज लक्षात घेऊन जायकवाडी प्रकल्पातील १०० एमएलडी पाणी राखीव ठेवले आहे.
शेंद्रा आणि बिडकीन औद्योगिक पट्ट्यातील कंपन्यांना लागणाऱ्या एकूण पाण्यापैकी ४२ टक्के पाणी हे सांडपाणी प्रक्रिया करून वापरण्यात येणार आहे. सध्या शेंद्रा आणि बिडकीन औद्योगिक क्षेत्रासाठी ३० एमएलडी पाण्याचा एमआयडीसीसोबत ऑरिकने करार केलेला आहे. मात्र, सध्या ऑरिक शेंद्र्यासाठी केवळ साडेचार एमएलडी पाण्याची गरज भासत आहे, तर बिडकीनमध्ये सध्या दाखल झालेल्या कंपन्यांना १ एमएलडी पाण्याचा एमआयडीसीकडून पुरवठा करण्यात येत आहे. भविष्यातील बिडकीन क्षेत्राचा होणारा विस्तार लक्षात घेऊन ऑरिकने ७२ एमएलडी पाणी उपलब्ध करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. यासाठी जायकवाडी प्रकल्प ते बिडकीनपर्यंत ९०० मी.मी. व्यासाची जलवाहिनी टाकण्याचे काम ऑरिकने हाती घेतले आहे. जानेवारी महिन्यात जलवाहिनीसंदर्भात निविदा प्रक्रिया राबवून कामाला सुरुवात करण्यात आली आहे.
जलशुद्धीकरण केंद्र उभारण्यात येणार
ऑरिक सिटीच्या शेंद्रा आणि बिडकीन क्षेत्रासाठी सध्या एमआयडीसीकडून ३० एमएलडी पाणी घेण्याचा करार करण्यात आलेला आहे. मात्र, शेंद्र्यासाठी सध्या केवळ चार ते साडेचार एमएलडीच पाणी लागते, तर बिडकीनला आज केवळ १ एमएलडी पाण्याची मागणी आहे. बिडकीन औद्योगिक पट्ट्यात मोठ्या कंपन्यांचे प्रकल्प साकारण्याचे काम सुरू आहे. शिवाय बिडकीनचा भविष्यात आणखी विस्तार होण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेऊन बिडकीनसाठी ७२ एमएलडी पाणी राखीव ठेवण्यात आले आहे. बिडकीनसाठी जायकवाडी येथून स्वतंत्र जलवाहिनी टाकण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. ९०० मि.मी. व्यासाची ही जलवाहिनी टाकून व जलशुद्धीकरण केंद्र उभारण्यात येणार आहे.
-अरुणकुमार दुबे, प्रकल्प व्यवस्थापक, ऑरिक